सुदिन दोन वेळा बीएससी नापास
By Admin | Updated: June 23, 2015 01:16 IST2015-06-23T01:16:00+5:302015-06-23T01:16:10+5:30
पणजी : सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी १९७९ मध्ये एप्रिल व आॅक्टोबर अशी दोन वेळा परीक्षा दिली होती आणि दोन्ही वेळा ते नापास झाले होते.

सुदिन दोन वेळा बीएससी नापास
पणजी : सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी १९७९ मध्ये एप्रिल व आॅक्टोबर अशी दोन वेळा परीक्षा दिली होती आणि दोन्ही वेळा ते नापास झाले होते. तसेच १९७८ ते १९८०पर्यंतच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख आढळत नाही. यामुळे ढवळीकर या प्रकरणात अडचणीत आले आहेत.
आम आदमी पक्षाकडून ढवळीकर यांच्या पदवीला आक्षेप घेतल्यानंतर सोमवारी महत्त्वाची कागदपत्रेही सादर केली आहेत. कागदपत्रांत, ढवळीकर १९७९ मध्ये एप्रिल व आॅक्टोबर अशा दोन वेळा परीक्षा देऊन नापास झाल्याचे म्हटले आहे. १९७८ ते १९८० पर्यंतच्या चौगुले महाविद्यालयात बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या याद्या पक्षाने दिल्या आहेत. पक्षाचे निमंत्रक वाल्मीकी नायक यांनी ही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. या तिन्हीपैकी एकाही उत्तीर्णांच्या यादीत ढवळीकरांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्या कथित बीएससी पदवीबाबतचा संशय आणखी बळावला आहे.
ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, १९७४-७५ साली फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलमध्ये एसएससी, तर १९७९-८० साली मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात बीएससी केल्याचे म्हटले आहे; परंतु चौगुले महाविद्यालयाकडून आम आदमी पक्षाने मिळविलेली कागदपत्रे त्यांचा हा दावा फोल ठरवीत आहेत. (प्रतिनिधी)