विद्यार्थ्यांना फक्त 'बीच'वर नेऊ नका!: मुख्यमंत्री; वैज्ञानिक संस्था, प्रकल्पांना भेट देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 07:31 IST2025-02-28T07:30:09+5:302025-02-28T07:31:22+5:30
साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन व शिक्षण खात्याच्या सहकार्याने साखळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांना फक्त 'बीच'वर नेऊ नका!: मुख्यमंत्री; वैज्ञानिक संस्था, प्रकल्पांना भेट देण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठे बदल केले जात आहेत. विद्यार्थीदशेतच कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शिक्षण संस्थांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. राज्यात अनेक दर्जेदार विज्ञान संस्था, प्रकल्प असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जावे. शाळा-महाविद्यालयांनी आता 'बीच'वर सहली घेऊन जाणे बंद करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन व शिक्षण खात्याच्या सहकार्याने साखळी महाविद्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे, भूषण सावईकर, दत्ताराम चिमूलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.
राज्य सरकार शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल करत आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशाचे थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांची वैज्ञानिक दृष्टी असामान्य होती. नवे-नवे शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होणे, यासाठी शिक्षण संस्थांनी उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी 'रोजच्या जीवनात विज्ञान' या विषयावर माहिती दिली.
गोव्यातील तरुणांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील उद्योगाशी संबंधित ज्ञान मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच 'विद्यार्थी कौशल्य कार्यक्रम' अंतर्गत राष्ट्रीय शेअर बाजार आणि गोवा सरकारमध्ये सामंजस्य करार केला आहे. 'विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे' ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची थीम आहे. भारत दीर्घकाळापासून वैज्ञानिक नवोपक्रमाचे केंद्र आहे. अवकाश संशोधन, अणू तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत उल्लेखनीय प्रगती करत आहे.
'मन की बात' ऐकाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दहा वर्षे 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन माहिती देत असतात. ही माहिती भारतात, जगात काय चालले आहे, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना मिळवण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. दुर्दैवाने शिक्षक व विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकतच नाहीत. त्यामुळे यापुढे सर्व विद्यार्थी, पालकांनी तसेच शिक्षकांनी 'मन की बात' हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
शिक्षकांनो तुमची जबाबदारी वाढलीय
आज विज्ञानाला खूप महत्त्व आहे. नुकत्याच झालेल्या चंद्रयान मोहिमेसाठी लागणारा डोम गोव्यात तयार झाला, याचे कुतूहल विद्यार्थ्यांना असायला हवे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून विद्यार्थ्यांचे विज्ञान तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.