पुष्पगुच्छासाठी पैसे नाहीत का?
By Admin | Updated: March 24, 2015 01:16 IST2015-03-24T01:12:42+5:302015-03-24T01:16:22+5:30
पणजी : पक्षाचा निरीक्षक बनल्यानंतर मी प्रथमच गोव्यात आलो. प्रथमच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पणजीतील कार्यालयात आलो.

पुष्पगुच्छासाठी पैसे नाहीत का?
पणजी : पक्षाचा निरीक्षक बनल्यानंतर मी प्रथमच गोव्यात आलो. प्रथमच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पणजीतील कार्यालयात आलो. अशा वेळी माझ्या हाती एक पुष्पगुच्छ देण्याएवढेही
पैसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाहीत का, असा प्रश्न उद्विग्न झालेल्या भास्कर जाधव यांनी विचारला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
अनेक महिन्यांनंतर गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निरीक्षक मिळाला आहे. मी प्रथमच राष्ट्रवादीच्या पणजी कार्यालयात आलो; पण तुम्ही मला साधा पुष्पगुच्छदेखील देत नाही, तुम्ही माझे साधे स्वागतदेखील करत नाही. एवढी वाईट आर्थिक स्थिती ओढावली आहे काय, असे जाधव यांनी संतप्त होउन विचारले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तेव्हा काय बोलावे तेच कळेनासे झाले. राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दारावर पक्षाचा झेंडादेखील लावलेला नाही. पक्ष कामाबाबत एवढी अनास्था तुमच्यामध्ये का म्हणून आहे? तुम्ही अशा निरुत्साही पद्धतीने पक्षचे काम कसे पुढे न्याल, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी जाधव यांनी झाडल्या.
अशा प्रकारे सडेतोड बोलणारे निरीक्षक राष्ट्रवादीच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रथमच पाहिले. पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, सरचिटणीस अविनाश भोसले, प्रमुख प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, अनिल जोलापुरे, समन्वयक प्रफुल्ल हेदे व ओबीसी विभाग प्रमुख देवानंद नाईक या वेळी उपस्थित होते.
पहिल्या भेटीवेळीदेखील राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी बैठकीसाठी कसे काय येत नाही, असा प्रश्न जाधव यांनी केला. आम्ही सर्वांना निमंत्रण पाठविले होते, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्या वेळी जाधव यांनी ‘प्रत्येक अनुपस्थित पदाधिकाऱ्याला फोन लावून द्या, मी स्वत: बोलतो,’ असे सांगितले. या वेळी जाधव स्वत: फोनवर काही पदाधिकाऱ्यांशी बोलले. काहीजणांनी अर्धवट व असमाधानकारक उत्तरे दिली, तर काहीजणांनी अनुपस्थितीचे
कारण सांगितले. (खास प्रतिनिधी)