‘आमदारांनी गाफील राहू नये’
By Admin | Updated: October 29, 2015 02:02 IST2015-10-29T02:02:22+5:302015-10-29T02:02:36+5:30
पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत खूप मेहनत घेतली

‘आमदारांनी गाफील राहू नये’
पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत खूप मेहनत घेतली. त्याचे चांगले फळ मिळाले. मात्र, विधानसभा निवडणूक २०१७ साली होणार असल्याने आताच्या यशामुळे भाजपच्या आमदारांनी व कार्यकर्त्यांनीही गाफील राहू नये, असा सल्ला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला.
बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मडगाव, वाळपई, केपे अशा ठिकाणी अगोदर भाजपचे नगरसेवक नव्हतेच. तिथेही आता भाजपला स्थान मिळाले आहे. पालिकांमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही, तरी आमचे नगरसेवक आता त्या पालिकांमध्ये पोहोचले आहेत. तिथे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आमच्या सगळ्याच आमदारांनी पालिका निवडणुकीवेळी जोरात काम केले. मात्र, आमदारांनी गाफील न राहता अजून काम वाढविण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीवेळी रिंगणात नव्हता, हा दावा चुकीचा आहे. काँग्रेसचे सगळेच आमदार पालिका निवडणुकीवेळी सक्रिय होते. त्यांनी उमेदवार उभे केले होते.
(खास प्रतिनिधी)