प्रभाग फेररचनेत गोलमाल : सरदेसाई
By Admin | Updated: July 15, 2015 01:46 IST2015-07-15T01:45:33+5:302015-07-15T01:46:17+5:30
मडगाव : नगरपालिका प्रभागांची फेररचना करताना मडगावात मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याचा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे

प्रभाग फेररचनेत गोलमाल : सरदेसाई
मडगाव : नगरपालिका प्रभागांची फेररचना करताना मडगावात मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याचा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. याला सत्ताधारी भाजप नेत्यांचा आशीर्वाद आहे. या फेररचनेला हिरवा कंदील मिळावा, यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला.
काही भाजप पुरस्कृत उमेदवारांना फायदा व्हावा, यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला हवी तशी प्रभागाची फेररचना केली जात असून या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभागांची फेररचना आणि राखीवता निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जावी, अशी मागणी यापूर्वी आपण याचसाठी केली होती, असे ते म्हणाले.
दरम्यान, फक्त मडगावातच नव्हे, तर दक्षिण गोव्यातील इतरही नगरपालिकांत भाजप नेत्यांनी फेररचना व राखीवतेत हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. कुंकळ्ळी पालिकेत सध्या जे दहा प्रभाग आहेत, ते बारा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत देमानी भागातील आपला प्रभाव कमी होऊ नये, यासाठी आमदार राजन नाईक यांनी या निवडणुकीत तेरा प्रभाग करण्याची शिफारस केली आहे. काणकोणातही प्रभाग रचनेत मंत्री रमेश तवडकर यांच्यासह माजी आमदार विजय पै खोत व इजिदोर फर्नांडिस यांचा हस्तक्षेप चालू असल्याचा आरोप आहे. केपे, सावर्डे व कुडचडे या तीन पालिकांतील स्थिती बरी आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)