जिल्हा पंचायत पक्षीय पातळीवर
By Admin | Updated: January 17, 2015 03:02 IST2015-01-17T02:55:36+5:302015-01-17T03:02:42+5:30
निवडणुकीसाठी फेररचना : प्रत्येक मतदारसंघात १७ हजार मतदार; मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

जिल्हा पंचायत पक्षीय पातळीवर
पणजी : राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी आता पक्षीय पातळीवरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्री-आमदारांच्या शुक्रवारी पर्वरी येथे झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळाली.
जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचे सरकारने ठरविले असून पक्षाचा यास पाठिंबा असेल, असे यापूर्वी भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेवेळी झालेल्या पक्षाच्या दोन महत्त्वपूर्ण बैठकांवेळीही ठरले होते. भाजपने आपले गट अध्यक्ष व सरचिटणीसांना याची कल्पना दिली होती. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांची बैठक झाली. त्या वेळीही जिल्हा पंचायत निवडणुकांबाबत चर्चा झाली व या निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्याने सर्व आमदारांनी त्यासाठी तयार राहावे, असे ठरले. पक्षीय पातळीवर निवडणुका घेण्यास सर्व आमदारांनी अनुकूलता दर्शविली. जिल्हा पंचायत निवडणुकांकडे विधानसभा निवडणुकीची उपांत्य फेरी याच दृष्टिकोनातून भाजप पाहात आहे.
प्रत्येक जिल्हा पंचायत मतदारसंघ साधारणत: १७ हजार मतदारांचा असावा, असेही यापूर्वी ठरले आहे. पूर्वी काही मतदारसंघ वीस-बावीस हजार मतदारांचे, तर काही सोळा-सतरा हजार मतदारांचे असायचे. ही तफावत आता मतदारसंघ फेररचनेवेळी दूर केली जाणार आहे.
(खास प्रतिनिधी)