आलेक्स सिक्वेरांना मंत्री म्हणून अपात्र ठरवा, अमित पाटकरांचे सभापतींना निवेदन
By किशोर कुबल | Updated: November 22, 2023 17:22 IST2023-11-22T17:21:43+5:302023-11-22T17:22:01+5:30
पणजी : नव्यानेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री म्हणून अपात्र ठरवावे,. अशी मागणी करणारे निवेदन कॉंग्रेस ...

आलेक्स सिक्वेरांना मंत्री म्हणून अपात्र ठरवा, अमित पाटकरांचे सभापतींना निवेदन
पणजी : नव्यानेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री म्हणून अपात्र ठरवावे,. अशी मागणी करणारे निवेदन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापतींना सादर केले आहे. पाटकर यांनी निवेदनात असे म्हटले आहे कि,‘सिक्वेरा यांच्याविरुध्द आधीच सभापतींकडे अपात्रता याचिका सादर केलेली आहे व त्यावर अजून निवाडा व्हायचा आहे.
सिक्वेरा यांची आमदारकीबद्दलच प्रश्नचिन्ह असताना त्यांना मंत्री म्हणून शपथ देणे योग्य नव्हे. मंत्री म्हणून त्यांना अपात्र ठरवावे. सप्टेंबर २०२२ मध्ये कॉंग्रेसचे जे आठ आमदार फुटले व कॉंग्रेस विधिमंडळ पक्षच भाजपात विलीन केला त्यात आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश होता. सिक्वेरा यांच्यासह आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस व संकल्प आमोणकर हे आठ आमदार त्यावेळी फुटले होते.
पाटकर यांनी या आठ फुटीर आमदारांविरुध्द सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केलेली आहे. शिवाय कॉंग्रेसचे अन्य एक नेते डॉम्निक नोरोन्हा व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही आठ फुटिरांविरुद्ध अपात्रता याचिका सादर केलेल्या आहेत. या मूळ याचिका अजून सुनावणीस यावयाच्या आहेत.