रिवणमधील वाद चिघळला
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-16T01:22:52+5:302014-07-16T01:24:24+5:30
मडगाव/रिवण : ‘त्या’ एचआयव्हीबाधित २३ विद्यार्थ्यांना रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता वेगळे वळण घेतले आहे.

रिवणमधील वाद चिघळला
मडगाव/रिवण : ‘त्या’ एचआयव्हीबाधित २३ विद्यार्थ्यांना रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता वेगळे वळण घेतले आहे. या मुलांना शाळेत प्रवेश दिल्यामुळे १६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश दाखले (लिव्हिंग सर्टिफिकेट) काढून घेतल्याने शिक्षण खात्यासमोर पेच निर्माण झाला आहे. आणखी १0 पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढण्याची तयारी ठेवली असून या संदर्भात अर्जही केले आहेत.
वरील १६ पालकांनी केपेतील होलीक्रॉस इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. फातिमा हायस्कूलच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोमवारपर्यंत १९ पालकांनी आपल्या मुलांचे नाव शाळेतून काढून घेण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ मुलांची लिव्हिंग सर्टिफिकेट्स आज मंगळवारी घेण्यात आली. या १६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी स्थानिक असून इतर विद्यार्थी बाहेरून आलेल्या कामगारवर्गाचे आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी आणखी ७ स्थानिक पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. अशा पालकांची संख्या ४0वर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात अधिकृत माहिती मिळविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक फा. जेरी फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जुझे आफोन्सो यांनी वृत्ताला दुजोरा दिला. काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)