गोविंद गावडे अन् दीपक ढवळीकर यांच्यात शाद्विक वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2025 08:00 IST2025-01-12T07:59:59+5:302025-01-12T08:00:49+5:30

युती तोडा, मगच बोला : गोविंद गावडे; 'त्यांनी' असे डगमगू नये : दीपक ढवळीकर

dispute erupts between govind gawade and deepak dhavalikar | गोविंद गावडे अन् दीपक ढवळीकर यांच्यात शाद्विक वादाची ठिणगी

गोविंद गावडे अन् दीपक ढवळीकर यांच्यात शाद्विक वादाची ठिणगी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जे राजकारणी आपण फोंड्यात कुठेही उभे राहून निवडून येऊ शकतो असे सांगत आहेत, त्यांना आधीच जनतेने नाकारले आहे. आता ते प्रियोळमधूनही उभे राहण्याची भाषा करत असून त्या पक्षाच्या नेत्यांनी आधी आमच्याशी असलेली युती तोडावी आणि मगच विधाने करावीत, असा सल्ला मंत्री गोविंद गावडे यांनी दीपक ढवळीकर यांचे नाव न घेता दिला आहे.

एकाच सरकारमध्ये राहून, अशी विधाने करणे चुकीचे आहे. खरे तर याची दखल भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घ्यावी, असेही मंत्री गावडे म्हणाले. कुणालाही कुठल्याही मतदारसंघात लढण्याचा अधिकार आहे. पण ज्यावेळी आपण एका सरकारचे घटक आहोत, अशावेळी त्या पक्षाच्या जबाबदार व्यक्तीने अशी विधाने करणे चुकीचे आहे. मागच्या निवडणुकीत टीएमसीसोबत युती करून लोकांना खोटी आश्वासने दाखवली होती. आता २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे काहींना वेध लागले आहेत. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही गावडे यांनी लगावला.

म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गावडे यांचे नाव न घेता काल रात्री प्रत्युत्तर दिले. ढवळीकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, मी मीडियाकडे स्वतः युतीविषयी बोलायला गेलो नव्हतो. मला पत्रकारांनी वारंवार विचारले तेव्हा मी भाष्य केले, पण मी कुणाचेच नाव घेतले नव्हते.

तुम्ही कुठच्या मतदारसंघातून २०२७ साली लढणार, असे मला विचारले तेव्हा मी प्रियोळ किंवा शिरोडामधून लढेन, असे सांगितले होते. माझ्या या विधानाने मंत्र्याने किंवा अन्य कुणीच डगमगून जाण्याचे कारण नाही.

ढवळीकर म्हणाले की, मगो व भाजपची यापूर्वी झालेली युती ही मंत्री गावडे यांना विचारून किंवा त्यांच्या उपस्थितीत झाली नव्हती. ती युती ज्या नेत्यांच्या उपस्थितीत व ज्या नेत्यांच्या सल्ल्याने झाली होती त्यांच्याशीच आम्ही २०२७ च्या निवडणुकीविषयी चर्चा करून व निर्णय घेऊ. त्यांनी जर युतीची गरज नाही, असे सांगितले तर मग आम्ही पुढील भाष्य करू. त्यामुळे आम्हाला अगोदर युती तोडा व मग बोला असे मंत्री गावडे यांनी सांगण्याची गरज नाही.
 

Web Title: dispute erupts between govind gawade and deepak dhavalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.