नेतृत्व बदलाची चर्चा

By Admin | Updated: March 22, 2015 01:18 IST2015-03-22T01:12:37+5:302015-03-22T01:18:20+5:30

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळू शकले नाही याबाबत भाजपच्या अनेक मंत्री-आमदारांमध्ये

Discussion of leadership change | नेतृत्व बदलाची चर्चा

नेतृत्व बदलाची चर्चा

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळू शकले नाही याबाबत भाजपच्या अनेक मंत्री-आमदारांमध्ये व पक्ष संघटनेतही असंतोष आहे. सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे; पण भाजप आणि स्वत: संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मागे ठाम आहेत. त्यामुळे नेतृत्व बदल शक्य नाही, अशी माहिती मिळाली.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मायकल लोबो, विष्णू वाघ व अन्य काही आमदार सरकारबाबत खुश नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल भाजपला अनुकूल लागले नाहीत यास सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत, असे काही मंत्री व आमदारांना वाटते. प्रशासन गतिमान करण्यासाठी व विकासकामांचा धडाका लावण्यासाठी नेतृत्व बदल व्हायला हवा, असे भाजपमधील काहीजणांना वाटते. पक्ष संघटनेतही येत्या एप्रिलमध्ये बदल व्हायला हवेत, अशा प्रकारचा आग्रह भाजपमध्ये काहीजण धरू लागले आहेत.
जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी उत्तर गोव्यात भाजपला जबर किंमत मोजावी लागली. दक्षिण गोव्यात भाजपला थोडे तरी यश मिळाले; पण सासष्टी तालुक्यात गोवा विकास पक्षाशी युती करून देखील भाजपची डाळ शिजली नाही. तिथे भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या. उत्तर गोव्यातील अपयशाबाबत भाजपमध्ये आत्मचिंतन सुरू झाले असून, आम्ही पुढील विधानसभा निवडणूक येईपर्यंत सगळ्या उपाययोजना करू, असे एका नेत्याने सांगितले.
भाजपला चांगला म्हणावा असा निकाल जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी लागलेला नाही, असे विधान उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी निवडणूक निकालानंतर केले आहे. काही आमदार नेतृत्व बदलाची मागणी करत आहेत; पण पर्रीकर हे पार्सेकर यांच्या मागे उभे आहेत. शिवाय, भाजप पक्ष संघटनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांचाही मुख्यमंत्री म्हणून पार्सेकर यांनाच पाठिंबा आहे. फ्रान्सिस डिसोझा किंवा अन्य कुणाला मुख्यमंत्रिपद सांभाळणे जमणार नाही, असे बहुतेकांना वाटते. (खास प्रतिनिधी)
 

Web Title: Discussion of leadership change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.