राष्ट्रवादीत असंतोषाचा भडका
By Admin | Updated: April 13, 2015 01:15 IST2015-04-13T01:15:27+5:302015-04-13T01:15:43+5:30
पणजी : राष्ट्रवादीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीवरून असंतोषाचा भडका उडाला असून ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांच्यासह सुमारे

राष्ट्रवादीत असंतोषाचा भडका
पणजी : राष्ट्रवादीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीवरून असंतोषाचा भडका उडाला असून ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांच्यासह सुमारे सहा पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. रविवारी सायंकाळी या सर्वांनी पक्षश्रेष्ठींना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे फॅक्स केले. आणखी अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत असून, यातील काहीजण काँग्रेस प्रवेशाच्या वाटेवर आहेत. मात्र, पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.
जुझे फिलिप डिसोझा, ट्रोजन डिमेलो, उपाध्यक्ष सलिम सय्यद, उपाध्यक्ष प्रकाश कळंगुटकर, सरचिटणीस सुभाष किनळकर, इतर मागास विभागाचे चेअरमन देवानंद नाईक यांचा पक्ष सोडलेल्यांमध्ये समावेश आहे.
पक्षश्रेष्ठींनी अॅड. सुहास वळवईकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने पक्षात तीव्र असंतोष उफाळून आला. गेले दोन दिवस असंतोष खदखदत होता. पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीला अध्यक्षपदी आणून बसविल्याची असंतुष्टांची भावना बनली आहे.
पक्षाचे निरीक्षक जाधव अलीकडेच गोव्यात आले होते, त्या वेळी त्यांनी प्रदेश कार्यकारिणी तसेच काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रदेशाध्यक्षपदाबद्दल चाचपणी केली होती. एका महिला नेत्याने वळवईकर यांचे नाव सुचवून त्याचा पाठपुरावा केला आणि शेवटी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला.
दीड महिन्यापूर्वी नीळकंठ हळर्णकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासूनच पक्षाला घरघर लागली.
(प्रतिनिधी)