वीज, पाणी बिले महागल्याने असंतोष
By Admin | Updated: April 11, 2015 02:18 IST2015-04-11T02:17:32+5:302015-04-11T02:18:49+5:30
पणजी : एका बाजूने लोकांना प्रचंड दराने विजेची वाढीव बिले येत आहेत व दुसऱ्या बाजूने सरकारने पाण्याचे दर दुप्पट केले आहेत.

वीज, पाणी बिले महागल्याने असंतोष
पणजी : एका बाजूने लोकांना प्रचंड दराने विजेची वाढीव बिले येत आहेत व दुसऱ्या बाजूने सरकारने पाण्याचे दर दुप्पट केले आहेत. या दरवाढीविरुद्ध सामान्य कुटुंबांमधून तीव्र निषेधाची भावना व्यक्त होत आहे.
घरगुती वापराच्या पाण्यासह छोटी हॉटेल्स आणि छोट्या रेस्टॉरंटसाठीही सरकारने पाण्याच्या दरात वाढ केली. दि. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात लोकांना पाण्याची वाढीव बिले येणार आहेत. १५ घनमीटरपर्यंत प्रति घनमीटर अडीच रुपये दर लागू करण्यात आला आहे. १५ ते २५ घनमीटरपर्यंत पाण्याच्या वापरासाठी ५ रुपये, २५ ते ५० घनमीटरपर्यंत पाण्यासाठी १० रुपये आणि ५० घनमीटरपेक्षा जास्त पाण्याच्या वापरावर प्रति घनमीटर १५ रुपये असा दर लागू झाला आहे. ही वाढ दुप्पट असल्याने लोकांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हॉटेल्सना पहिल्या ८० घनमीटर पाण्याच्या वापरासाठी प्रति घनमीटर २० रुपये, तर ८० घनमीटरपेक्षा जास्त पाण्याच्या वापरासाठी प्रति
घनमीटर २५ रुपये पाणीपट्टी करण्यात
आली आहे.
वाट्टेल तो दर लावून लोकांना सध्या वीज बिले पाठवली जात आहेत. जे कुटुंब दरमहा केवळ तीनशे रुपयांचे वीज बिल भरत होते, त्या कुटुंबाला आता बाराशे रुपयांचे वीज बिल येते. काहीजणांना तर सात-आठ हजार रुपयांची वीज बिले आली आहेत. लोक शासकीय यंत्रणेच्या नावे बोटे मोडत आहेत. तशात आता पाण्याचे दर दुप्पट करण्यात आले आहेत. यापुढे सरकार लोकांच्या नाका-तोंडात जाणाऱ्या हवेवरही कर लावील, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी व्यक्त केली. पेट्रोलचा दर अगोदर कमी करून मग आता पूर्णपणे वाढवला गेला आहे. ही लोकांची फसवणूक आहे. कुठचीच गोष्ट विद्यमान सरकारने करमुक्त ठेवलेली नाही. सामान्य माणसाला जगणेच अशक्य केले आहे, असे डिमेलो म्हणाले.
वेरे-बेती येथील राजेश दाभोळकर हे तरुण म्हणाले, की सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला जगूच देत नाही. गरिबांच्या कल्याणाच्या गोष्टी बोलणाऱ्या सरकारने पाणी व वीज खूपच महाग करून ठेवली आहे. पर्वरीसह अनेक भागांत लोकांना नियमितपणे पाणीही मिळत नाही व ग्रामीण गोव्यात विजेचा खेळखंडोबा चालू असतो. ग्रामीण भागातील लोक वाढीव पाणी बिले भरू शकणार नाहीत. केंद्र सरकारने तर औषधेही अत्यंत महाग करून ठेवली आहेत. (खास प्रतिनिधी)