मंत्रिमंडळातील मतभिन्नता उघड
By Admin | Updated: October 25, 2015 02:09 IST2015-10-25T02:09:09+5:302015-10-25T02:09:24+5:30
पणजी : गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांना सेवावाढ देण्याविषयी मंत्रिमंडळात मतभिन्नता होती. कॅबिनेट नोट मंत्र्यांकडे पाठविला गेला, तेव्हा त्यावर एका

मंत्रिमंडळातील मतभिन्नता उघड
पणजी : गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांना सेवावाढ देण्याविषयी मंत्रिमंडळात मतभिन्नता होती. कॅबिनेट नोट मंत्र्यांकडे पाठविला गेला, तेव्हा त्यावर एका मंत्र्याने नकारात्मक शेरा मारल्यामुळे उडालेल्या गोंधळावेळी ही मतभिन्नता उघड झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नंतर ही मतभिन्नता दूर करण्यात यश मिळविले.
शेट्ये यांच्या प्रतिमेविषयी कुणाचा वाद नव्हता. कुलगुरू म्हणून शेट्ये यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, ही मुख्यमंत्री पार्सेकर व संरक्षणमंत्री पर्रीकर यांची इच्छा होती. तथापि, सर्व मंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी वेळ मिळाला नाही. राज्यपालांनी प्रथम नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे गोवा विद्यापीठाचा कायदाच दुरुस्त करावा, असे ठरले. त्यासाठी शुक्रवारी सकाळी घाईघाईत कॅबिनेट नोट मंत्र्यांकडे पाठविला गेला. प्रथम कॅबिनेट नोट मंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे गेला. त्यांनी विद्यापीठ कायदा दुरुस्त करण्यास हरकत नाही; पण शेट्ये यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याविषयी फेरविचार व्हावा, असा शेरा मारला. मंत्री आर्लेकर यांनी असे मुद्दाम केले नाही. त्यांची चूक नव्हती. पार्सेकर यांनाच विषय आर्लेकरांसमोर मांडण्यासाठी वेळ मिळाला नव्हता, अशी माहिती मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना व एकूणच सरकारला नेमके काय अपेक्षित आहे, ते आर्लेकर यांना ठाऊक नव्हते.
मंत्री आर्लेकर यांच्यानंतर कॅबिनेट नोट ‘मगो’चे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे गेला. आर्लेकर यांचा शेरा वाचून मंत्री ढवळीकर गोंधळले. ते पार्सेकर यांच्याशी संपर्क साधत होते; पण संपर्क न झाल्याने त्यांनी थेट पर्रीकर यांच्याशी संपर्क
साधला. सरकारला नेमके काय अपेक्षित आहे ते त्यांनी जाणून घेतले व शेट्ये यांना मुदतवाढ देण्यास व विद्यापीठ कायदा
दुरुस्त करण्यास अनुकूल असा शेरा ढवळीकर यांनी मारला. पर्रीकर यांनी मंत्री आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला व मग आर्लेकर यांच्याही शेऱ्याचे रूपांतर सकारात्मक शेऱ्यामध्ये करण्यात आले. मंत्री दीपक ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने त्यांची कॅबिनेट नोटवर सही नाही.
या प्रतिनिधीने मुख्यमंत्री पार्सेकर यांना शनिवारी रात्री विचारले असता, ते म्हणाले की, आर्लेकर यांच्यापर्यंत विषय पोहोचविण्यास आपल्याला वेळ मिळाला नव्हता. तसा शेट्ये यांना त्यांचाही आक्षेप नाही. प्रारंभी थोडा संभ्रम निर्माण झाला, हे खरे आहे; पण मतभिन्नता नाही.
(खास प्रतिनिधी)