मोती डोंगर का डॉन कौन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 08:18 IST2025-02-27T08:17:58+5:302025-02-27T08:18:12+5:30
कामत यांनी मोती डोंगरावर झालेल्या सोहळ्यावेळी जबरदस्त विधाने केली.

मोती डोंगर का डॉन कौन ?
मडगाव मतदारसंघातील मोती डोंगरचा भाग यापूर्वी अनेकवेळा चर्चेत आलेला आहे. जेमतेम २ हजार ७०० मतदारांचा हा भाग आहे. बहुसंख्याक मुस्लीम बांधव, मूळचे परप्रांतीय आहेत. आमदार दिगंबर कामत काँग्रेस पक्षात होते, तेव्हा भाजपवाले मोती डोंगरकडे बोट दाखवून कामत यांना खिजवायचे. कामत मुख्यमंत्रिपदी होते, तेव्हाही विरोधकांकडून मोती डोंगरमध्ये टेन्शन निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. अर्थात आता तो इतिहास झाला. कामत आता भाजपचे सासष्टीतील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांची वर्णी लागल्यानंतर कामत यांचे वजन आणखी वाढले. शिवाय खाण घोटाळ्यात न्यायालयाने त्यांना अलीकडेच क्लीन चीट दिल्यानंतर कामत यांचे नैतिक बळही वाढले आहे. त्यामुळे ते आता आव्हान देण्याची भाषा करू शकतात.
परवा सोमवारी कामत यांनी मोती डोंगरावर झालेल्या सोहळ्यावेळी जबरदस्त विधाने केली. ती आव्हानात्मक भाषा व्हायरल झाली आहे. सगळीकडे कामत यांच्या हिंदीतील त्या शानदार विधानांची चर्चा सुरू आहे. दिगंबर कामत असोत, रवी नाईक असोत किंवा मायकल लोबो असोत, हे नेते काहीही बोलले की त्याची मोठी बातमी होते. त्यांची काही विधाने लोकांसाठी विनोदाची आणि मनोरंजनाचीदेखील ठरतात. 'मैने भगवान को प्रसाद लगाया था' असे कामत यांनी दोन वर्षांपूर्वी पक्ष बदलण्यापूर्वी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला सांगितले होते. तो व्हिडीओही खूपच व्हायरल झाला होता. गोव्यातील राजकीय नेते थेट देवाच्या संपर्कात असतात आणि पक्ष बदलण्यापूर्वीदेखील ते देवाला विश्वासात घेतात, हे देशभरातील लोकांना तेव्हा कळून आले.
सोमवारी मोती डोंगरवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेही उपस्थित होते. मोती डोंगरचा इतिहासच त्यावेळी कामत यांनी सांगितला. मोती डोंगरवरील बांधकामे पाडली जातील, घरे पाडली जातील किंवा तेथील लोकांचे पुनर्वसन केले जाईल, अशा बातम्या अलीकडे झळकल्या. तसेच, काहींनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेशही पाठवले होते. मोती डोंगरवरील घरे पाडली जातील वगैरे असे ते संदेश होते. कामत यांनी आपल्या भाषणात त्या संदेशाचाही संदर्भ दिला आणि मग कामत यांनी आवाजाची पट्टी वाढवली. 'मोती डोंगर को हाथ लगाने की किसी की मजाल नहीं' असे कामत यांनी ठणकावून सांगितले. हा इशारा कुणासाठी आहे, ते संबंधितांना कळले असेलच.
जब तक दिगंबर कामत खडा हैं, तब तक मोती डोंगर को कोई हात नहीं लगा सकता, असे अगदी फिल्मी स्टाइलमध्ये कामतांनी जाहीर करून टाकले आहे. एवढे धाडसी विधान करण्याची 'कापस्ताद' विश्वजीत राणे किंवा विजय सरदेसाई यांनादेखील कधी झाली नसावी. अर्थात मोती डोंगरला संरक्षण देणे हा आपला धर्म आहे किंवा ते आपले कर्तव्य आहे, असे कामत यांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण, त्यांचा मोती डोंगरविषयी पूर्ण अभ्यास आहे. तेथील मतदार सातत्याने त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. कामत काँग्रेसच्या तिकिटावर लढोत किंवा भाजपच्या, मोती डोंगरचे तरुण नेहमीच मडगावच्या बाबांची साथ देतात. फक्त गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीच मोती डोंगरची मते फुटली. राजकीयदृष्ट्या कामत यांना तो थोडा धक्काच ठरला. मोती डोंगरवरील थोडी मते लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसलासुद्धा मिळाली. यामुळे कामत यांनी नव्याने गंभीरपणे मोती डोंगरचा विचार केला आहे, असे दिसते.
परवा आपल्या भाषणातून कामत यांनी मोती डोंगरचे मूळ व कुळ कथन केले. विश्वजीतच्याही माहितीत त्यामुळे भर पडली. १९८५ साली जेव्हा प्रतापसिंग राणे मुख्यमंत्रिपदी होते, तेव्हा आपण नगरसेवक होतो आणि आपण राणे यांना मोती डोंगर दाखवला होता. त्यावेळी दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सिनिअर राणेंनी दिला होता, पण त्यावेळी मोती डोंगरच्या लोकांनी आम्ही आहोत तिथेच राहणार, असे स्पष्ट केले होते. त्यावेळपासून लोक मोती डोंगरशी व मडगावशी निगडित आहेत. ही सगळी माहिती देऊन कामत यांनी त्या लोकांना 'भिवपाची गरज ना' असाच सल्ला जणू दिला आहे. कामत मोती डोंगरचे डॉन नाहीत, पण तारणहार नक्कीच आहेत. मग डॉन कोण? याचे उत्तर कदाचित सरकारच देऊ शकेल.