कोकणीसमोर शिक्षण माध्यमाची अडचण

By Admin | Updated: July 9, 2014 01:05 IST2014-07-09T01:04:44+5:302014-07-09T01:05:07+5:30

पणजी : कोकणीची चळवळ संघटितदृष्ट्या ७५ वर्षांची झाली तरीही कोकणी अकादमीला गोव्यात जागा नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव आहे. सरकारने कोकणी भाषेसमोर

Difficulty with learning medium in Konkan | कोकणीसमोर शिक्षण माध्यमाची अडचण

कोकणीसमोर शिक्षण माध्यमाची अडचण

पणजी : कोकणीची चळवळ संघटितदृष्ट्या ७५ वर्षांची झाली तरीही कोकणी अकादमीला गोव्यात जागा नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव आहे. सरकारने कोकणी भाषेसमोर शिक्षणाच्या माध्यम प्रश्नाद्वारे मोठी अडचण निर्माण करून ठेवली आहे. देशी भाषांना डावलून विदेशी भाषेला अभय देणारे शिक्षण धोरण चुकीचे आहे आणि ते बंद होण्याची आवश्यकता आहे, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व कवी नागेश करमली यांनी सांगितले.
अखिल भारतीय कोकणी परिषदेने कला व संस्कृती भवनाच्या सभागृहात आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात करमली बोलत होते. ‘कोंकणीचो फुडार आनी म्हजें योगदान’ या विषयावर ते बोलत होते.
करमली म्हणाले, शिक्षणाचे माध्यम कोकणी असावे म्हणून केलेल्या चळवळीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सहभागी होते. भाजपाला सत्ता मिळाल्यास कोकणीला प्रथम स्थान देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले होते; पण माध्यमप्रश्नी वेगळी शक्कल लढवून समाजाचे तुकडे करण्याचे कारस्थान सरकारने केले आहे. कोकणीचे भविष्य नव्या पिढीच्या हातात असून त्यांनी पुढाकार घेतल्यास येणाऱ्या काळात गोवा कोकणीमय होईल. प्रशासकीय कामकाजही कोकणीत होण्याची गरज आहे. तसेच शहर आणि गावांची नावे बदलण्याचा विचारही शासकीय पातळीवरून व्हायला हवा. हल्लीच्या काळात बरीच युवा मंडळी कोकणी भाषेसाठी कार्यरत असल्याचे दिसते.
दरम्यान, कॉलेज विद्यार्थ्यांनीही ‘कोकणीच्या भविष्यासाठी आपले योगदान’ या विषयावर मते मांडली. यात प्रामुख्याने कोकणी भाषा प्रशासकीय कामकाजात येणे गरजेचे आहे, इंटरनेटवरही कोकणी भाषा असावी, राज्यात कोकणी विषयाचे डी.एड कॉलेज असावे, कार्यालयातील फलकांबरोबरच गावांचे, वाहतुकीचे फलकही पहिली कोकणी व इतर भाषेतून असावेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
दरम्यान, कोकणी भाषेच्या विकासासाठी कार्य केलेल्या माजी अध्यक्षांचा या वेळी प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ सुरेश आमोणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात उदय भेंब्रे, दामोदर मावजो, गुरुनाथ केळकर, अ‍ॅडविन डिसोझा, नागेश करमली, शीला कोळंबकर, गोकुळदास प्रभू, महाबळेश्वर सैल, रमेश वेळुस्कर, मीना काकोडकर, आर. एस. भास्कर, पुंडलिक नायक, तानाजी हळर्णकर, बस्ती वामन शणै, पॉल मोराज, शांताराम नाईक, डॉ. एच. शांताराम, अरविंद भाटीकर यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
समारोप सोहळ््याच्या अध्यक्षीय भाषणात आमोणकर म्हणाले, जागतिकीकरणामुळे विदेशी भाषा अतित्वाला बाधक असल्याचे दिसून येते. आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीशी एकरूप होत चालली आहे. त्यांना यापासून रोखण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण योग्य उपाय ठरेल. भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढीत, युवा पिढीला असायला हवी असे वाटत असल्यास मातृभाषेविना पर्याय नाही. परिषदेने दूर गेलेल्या कोकणी भाषाप्रेमींना एकत्र आणण्याची योजना आखावी. यामुळे कोकणीच्या विकासकार्याला बळ मिळेल. समारोप सोहळ््याची प्रस्तावना उषा राणे यांनी केली, तर आभार सुनीता काणेकर यांनी मानले.
(प्रतिनिधी)

Web Title: Difficulty with learning medium in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.