मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 08:15 IST2025-02-27T08:14:12+5:302025-02-27T08:15:05+5:30
'मी गणेश गावकर' या पुस्तकाचे प्रकाशन

मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राजकारणात आमदार झाल्याबरोबर काही लोकांना मंत्रिपद हवे असते. मात्र, गणेश गावकर हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी कधीच मंत्रिपदाचा हट्ट धरला नाही. म्हणूनच कदाचित त्यांचे कोणतेच काम सरकार दरबारी अडून राहिले नाही. मंत्री नसतानाही त्यांनी सावर्डे मतदारसंघाचा केलेला विकास हा डोळ्यात भरण्यासारखा होत आहे. गावकर यांच्या बाबतीत नाही हा शब्द माझ्या तोडून कधीच येणार नाही. आमची मैत्री कित्येक वर्षांची आहे. म्हणूनच मी म्हणजेच गणेश गावकर व गणेश गावकर म्हणजेच मी, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार गावकर यांचे कौतुक केले.
मोले येथील सातपाल मैदानावर आमदार गावकर यांचे जीवन चरित्र असलेल्या 'मी गणेश गावकर' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सदानंद तानावडे, आमदार गावकर, पुस्तकावर भाष्य करणारे डॉ. आशुतोष जावडेकर, अभिजित जोग, प्रकाशक मधुर बर्वे, गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. अथक संघर्षातून गणेश गावकर हे व्यक्तिमत्व तयार झाले आहेत. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार गावकर म्हणाले की, आजचे युवक छोट्याशा अपयशाने खचून जातात. मात्र, अपयश हे तुमची कसोटी घेण्यासाठी आलेले असते. अपयशानंतर पूर्ण जोमाने परत उठून कामाला लागा. यश जास्त दिवस तुम्हाला हुलकावणी देणार नाही. लेखक जावडेकर म्हणाले, आमदार गणेश गावकर यांनी समाज शक्तीचा गुणाकार केला म्हणून ते खाण कामगार ते लोक नेते बनू शकले.
आपल्या क्षेत्रात नेते व्हा
युवकांनी खरेच गणेश गावकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करायला हवा. आपण ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रातील नेते बनण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षेत्रात आम्हाला नवीन नेते निर्माण झालेले हवे आहेत. जिद्दीच्या जोरावर गणेश गावकर जर हे करू शकतात, तर आजचे युवक सुद्धा करू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
युवकांसमोर चांगले उदाहरण
खासदार तानावडे म्हणाले, गावकर नेहमी अन्यायाविरुद्ध उभे राहिले आहेत. त्यामुळे ते सामान्य लोकांना आपलेसे वाटतात. पराभवावर मात करून भविष्यात विजय कसा खेचून आणावा, याचे उदाहरण म्हणजे गणेश गावकर. युवकांना प्रेरणा मिळावी, या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिले असून, प्रेरणा घ्यावी असेच हे पुस्तक आहे.