मिठबावकर कुटुंबीयांना न्याय देण्याचा निर्धार

By Admin | Updated: December 7, 2015 01:42 IST2015-12-07T01:41:33+5:302015-12-07T01:42:14+5:30

पेडणे: गावडेवाडा-मोरजी येथील नीलेश श्रीकांत मिठबावकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढून

Determination to give justice to the family members of Mithabakkar | मिठबावकर कुटुंबीयांना न्याय देण्याचा निर्धार

मिठबावकर कुटुंबीयांना न्याय देण्याचा निर्धार

पेडणे: गावडेवाडा-मोरजी येथील नीलेश श्रीकांत मिठबावकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढून कुळाच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी दि. ६ रोजी विविध सामाजिक संघटनांनी मिठबावकर कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन सविस्तर चर्चा केली.
दि. २६ नोव्हेंबर रोजी नीलेश मिठबावकर यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना घडली होती. त्यांना २ वर्षांची आणि ३ वर्षांची अशा दोन मुली आहेत. नीलेश मिठबावकर व कुटुंबीय ज्या जागेत राहात होते ती जागा कुळ मूंडकार म्हणून नोंद आहे. हीच जागा बार्देश येथील एका मंत्र्याने विकत घेतली. जागा विकत घेताना कुळांना विश्वासात न घेताच लाड नामक मूळ भाटकाराने या मुंडकारांना सेटल न करताच पूर्ण जागा घरासह विकत घेतली आहे. ज्या मूळ घरात नीलेश मिठबावकर राहात होते, त्या घराच्या बाजूला त्यांनी एक छोटेखानी खोली व दुकानवजा बांधकाम केले होते. या बांधकामात जी खोली होती, ती खोली बिगर गोमंतकीयांना भाडेपट्टीवर दिली होती तर दुकान थाटून लहान लहान वस्तू विकून नीलेश आणि त्यांची पत्नी संसाराचा गाडा चालवत होते. मंत्र्यांच्या मुलाने दोन वर्षांपूर्वी सीआरझेड विभागाकडे तक्रार करून हे बांधकाम मोडून टाकले होते. त्या दिवसापासून नीलेश तणावाखाली होता. त्यातून त्याला दारूचे व्यसनही जडले. छोट्या मुलींना दूध आणायलाही पैसे नव्हते. पत्नी रोजंदारी करून कमवायची. त्यातच मन:स्थिती ठीक नसल्याचे २६ नोव्हेंबर रोजी नीलेशने आत्महत्या केली होती.
६ रोजी नीलेश मिठबांवकर कुटुंबीयांची पेडणे स्वाभिमान संघटनेचे अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, रोहिदास आरोलकर, विष्णू आजगावकर, गोवा प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर, मांद्रे गट अध्यक्ष नारायण रेडकर आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे आदींनी भेट घेऊन त्यांची विचारपूस करून कायदेशीर लढा उभारून मिठबांवकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या कुटुंबीयांची आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांना सहानुभूती देण्याबरोबर न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.
गोवा प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर यांनी प्रतिक्रिया देताना मिठबावकर कुटुंबीयावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने त्यात लक्ष घालून सोडवला पाहिजे. या जमीन प्रकरणाविषयी ४ वर्षांपूर्वी मुंडकार तसेच जमीन घेणाऱ्या मंत्र्यांसोबत चर्चा झाली होती. मंत्र्यांनी त्यांच्या मागण्याही मान्य केल्या होत्या.
मात्र मध्यस्थी करणाऱ्याने घोळ घातल्याने ही बोलणी फिस्कटली होती.
आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे म्हणाले की, गेली शेकडो वर्षे किनारी भागात राहणाऱ्या स्थानिकांनाच बेघर करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून मिठबावकर कुटुंबीयांवरील अन्याय व त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी जरी रस्त्यावर यावे लागले तरीही आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. पेडणे स्वाभिमानी संघटनेचे अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर म्हणाले की या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून कायदेशीर पद्धतीने लढाई लढण्यात येईल. मांद्रे गट कॉग्रेस नारायण रेडकर यांनीही मिठबाकर कुटुंबीयांना पाठिंबा दिला.
(प्रतिनिधी)

Web Title: Determination to give justice to the family members of Mithabakkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.