आरोंदा जेटीविरोधात आंदोलनाचा निर्धार
By Admin | Updated: February 16, 2015 02:14 IST2015-02-16T02:08:57+5:302015-02-16T02:14:54+5:30
हरमल : महाराष्ट्रातील आरोंदा या गोव्याच्या सीमेपलीकडील गावात सुरू झालेली व्हाईट आॅर्चिड इस्टेट कंपनीची जेटी स्थानिक

आरोंदा जेटीविरोधात आंदोलनाचा निर्धार
हरमल : महाराष्ट्रातील आरोंदा या गोव्याच्या सीमेपलीकडील गावात सुरू झालेली व्हाईट आॅर्चिड इस्टेट कंपनीची जेटी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता सुरू झाली आहे. त्याविरोधात सर्वशक्तीनिशी आंदोलन करण्याचा निर्धार केरीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. पुढील आठवड्यात सभेचे आयोजन करून आम्ही आमची शक्ती दाखवून देऊ, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या बैठकीत केरीचे सरपंच जयंत केरकर, पेडणे स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र प्रभुदेसाई, अॅड. प्रसाद शहापूरकर, पालयेचे सरपंच बाबनी आरोलकर, पंच रुणाली तळकर, उपसरपंच ज्योत्स्ना कासकर, फ्रान्सिस रॉड्रिगीस, रिमा हर्जी, रत्नाकर हर्जी, सचिन परब, फा. पेस्टा, आरोंदा संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरोडकर, आनंद शिरगावकर आदी उपस्थित होते. केरी-तेरेखोल गावातील पारंपरिक मच्छीमार बांधव जेटीवरील बार्ज वाहतुकीमुळे त्रस्त बनलेले आहेत. मासळी विकणे कठीण झाले आहे. ज्यावरून त्यांची उपजीविका व्हायची, तो मार्ग बंद झाल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे फ्रान्सिस रॉड्रिगीस यांनी सांगितले. आरोंदा जेटीविरोधात सर्वांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन केले.
देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, की पेडणे स्वाभिमानी संघटना अन्यायाविरोधात नेहमीच लढा देत राहिली आहे. आरोंदा जेटी ही अवघ्याच लोकांच्या स्वार्थापायी व भ्रष्ट लोकांच्या कल्पनेतील प्रकल्प आहे. त्यासाठी आम्ही जरी विविध राजकीय पक्षांचे असलो तरी लोकहिताविरोधातील प्रकल्पासाठी आम्ही मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. जोपर्यंत गावातील नागरिक जागृत होत नाहीत, तोपर्यंत लढा उभा राहत नाही.
या लढ्यासाठी एकजुटीने मतभेद बाजूला सारून सरकारच्या निर्णयाविरुद्ध दंड थोपटावे, असे आवाहन प्रभुदेसाई यांनी केले.
अॅड. शहापूरकर म्हणाले, की आरोंदा जेटी प्रकल्प हा मुख्य काही गोष्टी व नियम, अटी यांचे उल्लंघन करून झालेला आहे. पर्यावरणीय दाखला, सीआरझेड व अन्य सरकारी खात्यांना खोटी माहिती देऊन व संकेतस्थळावर अर्धवट माहितीचा हा प्रकल्प सध्या डोईजड बनला आहे. महाराष्ट्र सरकार सागरी पोलीस
दल व पिस्तूलधारी पोलिसांना
सोबतीस घेत कोळसा बार्ज वाहतूक करीत आहे.
याबाबत गोवा सरकारकडून त्या वाहतुकीला कशी परवानगी मिळाली याची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा लढा प्रखरपणे सुरू ठेवावा लागेल. फा. परेरा, सरपंच जयंत केरकर, आनंद शिरगावकर यांचीही भाषणे झाली.
हा प्रकल्प नुकसानकारक आहे. लोकप्रतिनिधी व विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकांच्या भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
या वेळी समन्वय समिती निवडण्यात आली. त्यात जयंत केरकर, बाबनी आरोलकर, निमंत्रक सचिन परब, रिमा हर्जी, सुरेश नाईक, गजानन नाईक, गंगाराम मठकर, संजय कासकर, शशिकांत पेडणेकर, रवींद्र पेडणेकर, आगुस्तीन डिसोझा, सांतान डायस, लुडविन डिसोझा व अन्य सदस्य आहेत. सूत्रसंचालन व आभार विलास आरोलकर यांनी मानले. सभेस १०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.
(प्रतिनिधी)