आयआयटीस मुकल्यात जमा

By Admin | Updated: June 19, 2015 01:35 IST2015-06-19T01:34:56+5:302015-06-19T01:35:06+5:30

पणजी : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीला (आयआयटी) गोवा जवळपास मुकल्यात जमा आहे. १५ लाख चौरस मीटर एवढी प्रचंड क्षेत्रफळाची जागा आयआयटीला दिली,

Deposit to IITs | आयआयटीस मुकल्यात जमा

आयआयटीस मुकल्यात जमा

पणजी : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीला (आयआयटी) गोवा जवळपास मुकल्यात जमा आहे. १५ लाख चौरस मीटर एवढी प्रचंड क्षेत्रफळाची जागा आयआयटीला दिली, तरी गोव्याला त्यातून मोठासा लाभ होणार नाही, याची कल्पना आल्याने गोवा सरकारही आता आयआयटीबाबत जास्त गंभीर नाही, अशी माहिती मिळाली.
धारगळ, खांडोळा व बेतूल-केपे अशा तीन ठिकाणी सरकारने १४ ते १५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा काही महिन्यांपूर्वी पाहिली आहे. आयआयटीच्या प्रकल्पासाठी एवढी जागा हवी आहे. यापूर्वी सरकारने धारगळमध्येच एके ठिकाणी ८ लाख चौरस मीटर जागा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवली होती. ती अपुरी पडल्याने केंद्रीय मंत्रालयाने मग आयआयटी गोव्यात सुरू करण्याबाबत जास्त रस व गांभीर्य दाखवले नाही. आयआयटीसाठी कायमस्वरूपी जागा मिळाली, तरच तात्पुरते वर्ग फर्मागुडी येथे सुरू करण्याची मंत्रालयाची तयारी होती. तथापि, कायमस्वरूपी जागा निश्चित होण्यापूर्वीच ‘तुम्ही वर्ग सुरू करा,’ अशी भूमिका गोवा सरकारनेही घेतली नाही. राज्यातील तीन ठिकाणच्या जागा पाहण्यासाठी मंत्रालयाचे अधिकारी गोव्यात पुन्हा आले नाहीत.
राज्यात अगोदरच जमीन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. एसईझेडमध्ये २३ लाख चौरस मीटर जागा अडकलेली आहे. त्यामुळे एका आयआयटीसाठीच पंधरा लाख चौरस मीटर जागा का म्हणून द्यावी, असा प्रश्न गोवा सरकारलाही पडला असल्याची माहिती मिळाली. पंधरा लाख चौरस मीटर जागा देऊन आयआयटी गोव्यात उभी राहिली, तरी त्यात गोव्यातील केवळ दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. बहुतांश विद्यार्थी हे अखिल भारतीय स्तरावरील असतील. याबाबत गोवा सरकारने विचार केला आहे. त्यामुळे आयआयटी संस्था कोणत्याही प्रकारे गोव्यात यायलाच हवी, असा हट्ट आता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही धरलेला नाही. आयआयटीच्या प्रस्तावाचा केंद्रीय स्तरावर गंभीरपणे पाठपुरावा करण्याची अजून तरी गोवा सरकारची भूमिका नाही. (खास प्रतिनिधी)

Web Title: Deposit to IITs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.