फ्रान्सिस डिसोझांनी मुख्यमंत्री व्हावे!
By Admin | Updated: October 7, 2014 01:42 IST2014-10-07T01:40:44+5:302014-10-07T01:42:52+5:30
पणजी : पर्रीकर सरकारमधील काही मंत्री व आमदार हे उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचे कट्टर समर्थक आहेत. काहीजण डिसोझा यांच्या गटातील मानले जातात.

फ्रान्सिस डिसोझांनी मुख्यमंत्री व्हावे!
पणजी : पर्रीकर सरकारमधील काही मंत्री व आमदार हे उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचे कट्टर समर्थक आहेत. काहीजण डिसोझा यांच्या गटातील मानले जातात. डिसोझा हे मुख्यमंत्री बनावे, अशी सुप्त इच्छा काही मंत्री, आमदारांची आहे. शनिवारी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस सोहळ्यावेळी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी जाहीरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या. यावर डिसोझा यांनी मात्र केवळ स्मित केले.
मंत्री मांद्रेकर, आमदार किरण कांदोळकर, आमदार लोबो, ग्लेन टिकलो हे डिसोझा यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवोलीचे आमदार असलेले मांद्रेकर यांचे तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी पटतही नाही. मांद्रेकर व पर्रीकर यांच्यात संवादही खूप कमी होतो. मंत्री मांद्रेकर यांनी डिसोझा यांच्या वाढदिवस सोहळ्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा विषय उपस्थित केला. डिसोझा व मी एकाच वेळी आमदार बनलो. डिसोझा हे मुख्यमंत्री बनायला हवेत. ते निदान पंधरा दिवस तरी किंवा दोन दिवस तरी मुख्यमंत्री बनावे, अशी इच्छा मांद्रेकर यांनी व्यक्त केली.
यानंतर आमदार लोबो यांनीही तोच सूर लावला. मांद्रेकर यांच्या भावनांशी मी सहमत आहे. डिसोझा हे कधी तरी मुख्यमंत्री बनायला हवेत, असे म्हणत लोबो यांनी मांद्रेकरांना पाठिंबा दिला.
(खास प्रतिनिधी)