दिल्ली-गोवा दुरांतो एक्सप्रेसची मागणी
By Admin | Updated: June 15, 2015 01:31 IST2015-06-15T01:31:26+5:302015-06-15T01:31:36+5:30
पणजी : दिल्ली-गोवा अशी दुरांतो एक्सप्रेस रेल्वेसेवा सुरू केली जावी, अशी मागणी राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने पुढे आणली आहे.

दिल्ली-गोवा दुरांतो एक्सप्रेसची मागणी
पणजी : दिल्ली-गोवा अशी दुरांतो एक्सप्रेस रेल्वेसेवा सुरू केली जावी, अशी मागणी राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने पुढे आणली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव तयार झाला असून येत्या आठवडाभरात पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर हे हा प्रस्ताव घेऊन दिल्लीस जाणार आहेत.
दिल्ली-गोवा अशी थेट दुरांतो एक्सप्रेस सुरू झाली तर पर्यटकांना त्याचा लाभ होईल. सगळेच दिल्लीहून विमानातून गोव्यात येऊ शकत नाहीत, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. मध्यंतरी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गोवा भेटीवर असताना आपण त्यांच्याशी याविषयी बोललो आहे. प्राथमिक चर्चा त्या वेळी झाली होती. आता यापुढे आठवडाभरात आपण प्रस्ताव घेऊन दिल्लीला जाईन. वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही तिथे चर्चा होईल, असे परुळेकर म्हणाले. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर मुंबईहून पर्यटक ट्रेन गोव्यात सोडण्यात आली होती. त्या विषयाचाही पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दाबोळी विमानतळावर चार्टर विमानांकडून मोठ्या प्रमाणात प्रति प्रवासी व्हिसा आकारला जातो. या विषयाचाही पाठपुरावा करीन. आपल्यासोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेही असतील. अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनाही भेटणे, विषयांचा पाठपुरावा करणे अशा हेतूने आपण दिल्लीला जाणार आहे, असे मंत्री परुळेकर यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)