पीडीए अध्यक्षपदावरून लोबोंना हटवा : राष्ट्रवादी
By Admin | Updated: April 9, 2015 01:25 IST2015-04-09T01:25:12+5:302015-04-09T01:25:31+5:30
पणजी : आमदार मायकल लोबो यांची सीआयडी गुन्हा शाखेचे पोलीस बांधकाम परवाना प्रकरणात चौकशी होत असल्याने त्यांना उत्तर गोवा

पीडीए अध्यक्षपदावरून लोबोंना हटवा : राष्ट्रवादी
पणजी : आमदार मायकल लोबो यांची सीआयडी गुन्हा शाखेचे पोलीस बांधकाम परवाना प्रकरणात चौकशी होत असल्याने त्यांना उत्तर गोवा पीडीएच्या अध्यक्षपदी राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
उत्तर गोवा पीडीएची मुदत महिनाभराने वाढविण्याच्या निर्णयालाही डिमेलो यांनी आक्षेप घेतला आहे. लोबोंविरुध्दच्या सांवतावाडा, कळंगुट येथील सर्वे क्रमांक ३१९/२, ३, ४, ५ व १२ बांधकाम परवाना प्रकरणात गुन्हा शाखेने अजून आपला अहवाल दिलेला नाही किंवा त्यांना निर्दोषही ठरविण्यात आलेले नाही. पीडीए बांधकाम परवानाविषयक प्रकरणे हाताळते त्यामुळे बांधकामाशी संबंधित कोणत्याही यंत्रणेवर त्यांना ठेवणे गैर असल्याचे डिमेलो यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुरगाव पीडीएवर आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या नियुक्तीवर पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्को शहराचा बाह्य विकास आराखडा आता यायचा आहे, त्यामुळे पुढे बांधकाम गैरव्यवहारास बराच वाव असून त्या हेतूनेच आल्मेदा यांनी हे पद घेतल्याचा आरोप डिसोझा यांनी केला. आल्मेदा यांची नियुक्ती झाल्यापासून अनेक फाइल्स मुरगाव पीडीएकडे तुंबल्या असून मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कामसुत्रावरही बंदी आणावी काय : डिमेलो
दरम्यान, कारखाने, बाष्पकमंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता ढवळीकर यांनी पालकांनी मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये, असे जे विधान केले आहे त्यावर डिमेलो यांनी तीव्र प्रतिकिया व्यक्त करताना धार्मिक फूट घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. ढवळीकर यांच्या या विधानाला भाजपचे समर्थन आहे, हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. महिलांवरील अत्याचाराला कॉन्व्हेंट शिक्षण जबाबदार धरता येणार नाही. उद्या कोणी कामसुत्रावर बंदी आणा असे म्हटले तर चालेल काय, असा सवाल डिमेलो यांनी केला. अजंठा, एलोरा, खजुराहो लेण्यांना विद्यार्थी सहली काढून भेट देत असतात, त्यावरही बंदी आणावी काय, असा प्रश्न त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)