मराठी राजभाषेसाठी निर्णायक लढा; प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 11:46 IST2025-03-04T11:45:12+5:302025-03-04T11:46:13+5:30

गोमंतक मराठी अकादमीतील बैठकीत निर्णय

decisive fight for marathi as the official language in goa guidance from subhash velingkar | मराठी राजभाषेसाठी निर्णायक लढा; प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचे मार्गदर्शन

मराठी राजभाषेसाठी निर्णायक लढा; प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी: शासकीय पातळीवर मराठीवरील सातत्याने होणारा अन्याय कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर मराठीला तिच्या हक्काचा राजभाषेचा दर्जाच मिळायला हवा यासाठी आवश्यक निर्णायक लढ्याची रूपरेषा ठरवण्यासाठी पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यालयात बैठक झाली.

गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी राजभाषा व्हावी अशी तीव्र इच्छा असलेल्या निवडक कार्यकर्त्यांची या बैठकीस उपस्थिती होती. यासंदर्भात राज्यात जागृती करण्याचा व मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. 

प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी बोलावलेल्या या बैठकीस गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, मराठी असे आमुची मायबोलीचे निमंत्रक प्रकाश भगत व ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ व्यासपीठावर उपस्थित होते.

वेलिंगकर यांची निवड

या चळवळीचे राज्य-निमंत्रक म्हणून प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी राजभाषा आंदोलनावेळी केलेल्या संघर्षाची माहिती दिली.

कोंकणीला रोमी लिपी देणे अराष्ट्रीय असल्याचे सांगून, त्यांनी कोंकणीशी आमचे वैर नसून, राजभाषा दर्जा हा मराठीचा हक्क असल्याचे सांगितले.

एकही आमदार नाही

गो. रा. ढवळीकर यांनी मराठी राजभाषा व्हावी म्हणून गेली ४० वर्षे चालू असलेल्या लढ्यातील महत्त्वाच्या घटना विशद केल्या. मगो पक्षाने मराठीची कास सोडल्याने आज मराठी राजभाषेसाठी याचना करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. कै. विष्णू वाघ आणि नरेश सावळ यांच्यानंतर विधानसभेत मराठीसाठी आवाज उठवणारा एकही आमदार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

गोमंतक मराठी अकादमी करणार सर्वतोपरी मदत

प्रदीप घाडी आमोणकर यांनी स्वागत केले. या आंदोलनासाठी गोमंतक मराठी अकादमी सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. गुरुदास सावळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. आगामी काळात मराठी राजभाषा व्हावी यासाठी मोहीम राज्यभर नेण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी कवयित्री डॉ. अनुजा जोशी, शिक्षणतज्ज्ञ गोविंद देव, राजभाषा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा मोघे, रोशन सामंत, निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर, सूर्यकांत गावस, नितीन फळदेसाई, परेश पणशीकर, प्रवीण नेसवणकर, प्राचार्य संदीप पाळणी, विनय नाईक, संतोष धारगळकर, विजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजी देसाई, गोमंतक मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. मधू घोडकिरेकर, म.रा.प्र.स.चे युवा कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी, लेखक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. नारायण महाले, लेखक प्रमोद कारापूरकर, रामदास सावईवेरेकर, नरेंद्र आजगावकर यांचा समावेश होता.

Web Title: decisive fight for marathi as the official language in goa guidance from subhash velingkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.