न्युमोनियामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय
By Admin | Updated: November 6, 2015 02:15 IST2015-11-06T02:15:29+5:302015-11-06T02:15:40+5:30
पणजी : लहान मुलांमध्ये न्युमोनियामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असून जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणामध्ये न्युमोकोक्कल काँज्युगेट लसीचा अंतर्भाव

न्युमोनियामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय
पणजी : लहान मुलांमध्ये न्युमोनियामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असून जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणामध्ये न्युमोकोक्कल काँज्युगेट लसीचा अंतर्भाव करण्याची शिफारस केली आहे. ही लस राज्यातील लहान मुलांनाही मिळावी यासाठी येत्या १२ रोजी जागतिक न्युमोनियादिनाच्या निमित्ताने इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सच्या गोवा शाखेतर्फे सरकारला प्रस्ताव सादर केला जाईल.
इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या गोवा प्रदेश अध्यक्षा डॉ. सुषमा कीर्तनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याआधी विश्वजित राणे आरोग्यमंत्री असताना या लसीबाबत तोंडी प्रस्ताव सरकारला दिला होता आता तो लेखी स्वरूपात दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, १ ते ५९ महिने वय असलेल्या मुलांमधील ११ टक्के मृत्यू न्युमोनियाने होतात. हा आजार सायलंट किलर आहे त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या आजाराविषयी सतर्कता वाढवली जाण्याची आणि न्युमोकोक्कल न्युमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.
संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, बालरोगतज्ज्ञ हर्षद कामत म्हणाले की, ज्या देशांमध्ये पाच वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांमधील मृत्यूचे प्रमाण दर हजारी ५0 पेक्षा जास्त आहे, त्या देशांमध्ये लसीकरण मोहिमेत वरील लसीचा समावेश करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. भारतातील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी ५२.७ इतके आहे.
ते पुढे म्हणाले की, २४ ते ५९ महिने वय असलेल्या मुलांना विशेषत: ज्यांची फुफ्फुसे कमकुवत आहेत. अरुंद श्वसनमार्ग, कमजोर प्रतिकारशक्ती, कर्करोग, कार्डिओव्हॅस्कुरल आजार, एचआयव्ही, कांजिण्या यांचा धोका असलेली अर्भके, नवजात बालके आणि मुदतीच्या आधी जन्माला आलेली बाळे यांना ही लस देणे हितावह आहे.
आकडेवारी असे सांगते की, जगभरात २0१५ मध्ये नोंद झालेल्या ५.९ दशलक्ष बालमृत्यूंपैकी अंदाजे १.२ दशलक्ष मृत्यू भारतात झाले आहेत. लहान मुलांमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्ये न्युमोनियाचा क्रमांक पहिला आहे.
संघटनेच्या गोवा शाखेच्या सचिव डॉ. पूनम संभाजी म्हणाल्या की, न्युमोनिया हा श्वसनाशी संबंधित किंवा फुफ्फुसांना संसर्ग झाल्याने होणारा आजार आहे. वेगवेगळ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे तो होतो. बराच ताप येणे, खोकला, छातीतील वेदना, खूप घाम येणे, अंगावरून शिरशिरी जाणे, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि श्वसनामध्ये अडथळे येणे ही न्युमोनियाची लक्षणे आहेत. छातीच्या एक्स रेमधून अचूक निदान करता येते. स्ट्रप्टोकोक्कस न्युमोनिए या जीवाणूमुळे होणाऱ्या न्युमोनियातून रक्तसंसर्ग, सेप्सिस, कानातील संसर्ग, मेनिन्जायटिस आणि जीवास घातक ठरणाऱ्या इतर समस्या उद्भवू शकतात. (प्रतिनिधी)