नातेसंबंध, प्रेमप्रकरण आदींमधून घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणामधून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा राग मनात ठेवून या मुलीच्या वडिलांनी बदला घेण्यासाठी तिचा कथित प्रियकर असलेल्या १७ वर्षीय युवकावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोव्यातील धारगळ येथील सुकेकुळण परिसरात घडली आहे. या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखणी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे येथील निलेश गजानन देसाई या मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. तसेच पोलीस चौकशीमध्ये आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी सकाळी गोव्यातील पेडणेजवळील धारगळ येथील सुकेकुळण परिसरात बसची वाट पाहत थांबलेल्या ऋषभ शेट्ये या १७ वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. मदतीसाठी धावाधाव करणाऱ्या या युवकाला एका व्यक्तीने मदत करत रुग्णालयात दाखल केले होते. तसेच त्याला पुढील उपचारांसाठी बांबुळी येथे दाखल करण्यात आले. या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचे बोलले जात होते. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. तसेच या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील निलेश देसाई या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आणि आरोपीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी निलेश देसाई याच्या मुलीने मे महिन्यात विषप्राशन करून जीवन संपवलं होतं. तिच्या मृत्यूला ऋषभ शेट्ये हा जबाबदार असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. त्यातूनच या वडील निलेश देसाई याने संधी साधून ऋषभ शेट्ये याच्यावर ॲसिड हल्ला केला.
सदर प्रकरणातील आरोपीची मुलगी ही गोव्यातील धारगळ येथे शिक्षणासाठी राहत होती. तिथे ही मुलगी आणि ऋषभ शेट्ये यांच्यात प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. दरम्यान, सदर तरुणी मे महिन्यात कळणे येथे गावी आली असताना तिने विषप्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेरीस बांबुळी येथे उपचार सुरू असताना या मुलीचा २० मे रोजी मृत्यू झाला. त्यावेळी या मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला हे न कळल्याने शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता.
दरम्यान, मुलीच्या मृत्यूनंतर नीलेश देसाई याने तिच्या मोबाईल तपासला असता त्यामध्ये सदर युवकासोबतचे व्हॉट्सॲप चॅट तसेच काही आक्षेपार्ह फोटो सापडले होते. त्यानंतर याबाबत वडील निलेश देसाई याने पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच या युवकाला धडा शिकवण्याची योजना मनात आखली होती. अखेरीस त्याने या युवकावर ॲसिड हल्ला करत मुलीच्या मृत्यूचा भयंकर बदला घेतला.