नृत्य पार्ट्यांच्या विरोधात न्यायालयात धाव
By Admin | Updated: December 26, 2014 02:10 IST2014-12-26T02:05:08+5:302014-12-26T02:10:19+5:30
अंतरिम स्थगितीची मागणी : नियोजित वेळी दोन्ही पार्ट्या करण्यास मनाई करा

नृत्य पार्ट्यांच्या विरोधात न्यायालयात धाव
पणजी : सुपरसोनिक आणि सनबर्न पार्ट्यांचे गोव्यात बेकायदेशीरपणे आयोजन केल्याचा दावा करून काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली आहे. नियोजित वेळी दोन्ही पार्ट्या करण्यास मनाई करण्याचा अंतरिम आदेश देण्यात यावा, अशी मागणी त्यात केली आहे.
वागातोर येथे २७ ते २९ डिसेंबर २०१४ या दरम्यान पर्सेप्ट ग्रुपतर्फे आयोजित सनबर्न पार्टीसाठी आणि कांदोळी येथे २७ ते ३० डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या वायाकॉमतर्फे होणाऱ्या सुपरसोनिक पार्टीसाठी अद्याप सरकारने परवानगी दिली नसली तरी आयोजकांतर्फे जय्यत तयारी सुरू असल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. अद्याप आयोजकांकडून वाणिज्य कर, मनोरंजन कर आणि इतर कोणत्याही स्वरूपाचा कर भरलेला नाही, तसेच आवश्यक परवानेही घेतलेले नाहीत. सरकारनेही या दोन्ही पार्ट्यांना आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. या पार्ट्यांसाठी सुरक्षा देणे शक्य होणार नसल्याचे पोलिसांनीही सरकारला पत्र लिहिले आहे, असे असताना बिनदरकारपणे पार्ट्यांच्या तिकिटांची विक्री सुरू आहे. ही विक्री बेकायदेशीर आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
आयोजकांनी केलेल्या तिकीट विक्रीचा हिशेब गुलदस्त्यात आहे. तसेच त्यांनी हिशेब दिला तरीही त्याची सत्यता पडताळून पाहाण्याची यंत्रणा सरकारकडे नाही. म्हणून आयोजकांकडून कराचा भाग हा पार्ट्या साजऱ्या करण्यापूर्वीच फेडून घेणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मुख्याधिकारी, पर्यटन खाते, वाणिज्य खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, गृहसचिव, किनारी नियम व्यवस्थापन प्राधिकरण हणजुणे
आणि कांदोळी यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)