लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: आज जगभरात सायबर संदर्भात गुन्ह्यात वाढ होऊ लागलेली आहे. सायबर च्या माध्यमातून माणसांच्या संपूर्ण दैनंदिनी जीवन प्रणालीवरच आघात होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आज हे सर्व प्राथमिक स्तरावर चालू आहे. भविष्यात याची व्याप्ती वाढणार आहे. त्यावेळी सायबर कमांडोज ही देशाची खरी ताकद बनणार आहे.असे उद्गार पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी काढले.
येथील फॉरेन्सिक विद्यापीठाच्यागोवा कॅम्पसमध्ये भारतातल्या पहिला सायबर कमांडोज चा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केन्द्रीय गृह मंत्रालयच्या आयफोरसी चे डेप्युटी कमांडंट कंदाले गौतम कुमार, फॉरेन्सिक विद्यापीठगोवा कॅम्पसचे संचालक नवीन कुमार चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अलोक कुमार पुढे म्हणाले की देशाच्या सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण असाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली सायबर कमांडोज ची पहिली तुकडी आज देश सेवेसाठी तयार झाली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मागच्या पंचवीस वर्षाचा आलेख पाहता देशात अमुलाग्र बदल झालेला आहे. सीमा ओलांडून जमिनीवरून होणारे हल्ले आज थेट सायबर च्या माध्यमातून अदृश्य रूपातून होऊ लागलेले आहेत.
ते पुढे म्हणाले कि जागतिक स्तरावर मानवांचे सर्व व्यवहार आज संगणक म्हणजेच सायबर च्या माध्यमातून होऊ लागले आहेत. साहजिकच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी ही नस ओळखली आहे. सायबर फ्राॅडचे आकडे भयानक आहेत. देशात 22 ते 25 हजार कोटी रुपयांचे सायबर आर्थिक फसवणूक गुन्हे झालेले आहेत. हा आकडा गोव्याच्या एकूण बजेट एवढा आहे. गोव्यातच मागच्या वर्षी 101 कोटी सायबर आर्थिक फसवणूक गुन्हे नोंद झालेले आहेत. परत लोकलाजेस्तव बहुतांश लोक गुन्हे नोंद करायलाच जात नाहीत. सायबर गुन्हेगारीचा एकूण अभ्यास करता सायबर माध्यमातून आर्थिक फसवणूक हि एकदम नगण्य बाब आहे.विविध क्षेत्रात आज सायबर गुन्हेगारांनी व्याप्ती वाढवलेली आहे. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून सायबर गुन्हेगार आज संपूर्ण हवाई यंत्रणा वेठीस धरु लागले आहेत. म्हणूनच बदलत्या जगात सायबर कमांडो चे महत्व वाढलेले आहे. भविष्यात सायबर संदर्भात लढाई झाल्यास देशाच्या सुरक्षेच्या नजरेतून सायबर कमांडोज दुवा ठरतील.
ते पुढे म्हणाले की आपल्या राज्यात परतल्यानंतर देशभरातील या कमांडोजनी स्थानिक सरकारच्या माध्यमातून अनेकांना उपयुक्त मार्गदर्शन करायला हवे. स्थानिक राज्य सरकारने सुद्धा सायबर कमांडोजच्या ज्ञानाचा प्रत्येक स्तरावर उपयोग करून घ्यायला हवा. राज्याच्या सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ह्या कमांडोना उपयुक्त कामगिरी करावी लागेल.
गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या आय फॉरसेक चे राष्ट्रीय डेप्युटी कमांडट के गौतम कुमार यावेळी बोलताना म्हणाले की सहा महिन्याच्या कालावधीत सायबर कमांडोंनी जे ज्ञान मिळालेले आहे त्याचा वापर ते गुणात्मक पद्धतीने कसा करतात यावर त्यांचे मूल्यांकन होईल. सायबर सुरक्षेच्या बाबतीत येणारी अनेक आव्हाने त्यांना पेलावी लागतील. देशाची सायबर सुरक्षा आज ह्या कमांडोच्या हाती आलेली आहे. जबाबदारी पूरक काम करून तुम्ही या क्षेत्रात नवे आयाम निर्माण करा. गृह मंत्रालयाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही सहकार्य वेळोवेळी लागेल ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॅम्पस संचालक नवीन कुमार चौहान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.