विरोधकांची घणाघाती टीका
By Admin | Updated: March 25, 2015 01:40 IST2015-03-25T01:30:59+5:302015-03-25T01:40:24+5:30
पणजी : तीन वर्षे उलटली, तरी सरकार आश्वासनांची पूर्तता करू शकलेले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात प्रादेशिक आराखड्याचा उल्लेख नाही,

विरोधकांची घणाघाती टीका
पणजी : तीन वर्षे उलटली, तरी सरकार आश्वासनांची पूर्तता करू शकलेले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात प्रादेशिक आराखड्याचा उल्लेख नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी आभारदर्शक ठरावावरील चर्चेच्यावेळी विधानसभेत केली. बेकायदा बांधकामे, पक्षीय पातळीवर घेण्यात आलेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुका, ड्रग्स व्यवसाय आदी विषयांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
राज्यात सर्वत्र स्वैर बांधकामे येत आहेत. पंचायत स्तरावर बेकायदा बांधकामांना ऊत आलेला आहे. राज्यात ६५ टक्के वनक्षेत्र असल्याचा दावा दिशाभूलकारक आहे. प्रादेशिक आराखड्याशिवाय विकासाला दिशा मिळणार नाही. नवा आराखडा गेला कुठे, असा सवाल राणे यांनी केला. बांधकाम, कृषी, वन यासाठी जमीन अधिसूचित करा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेतल्याबद्दल राणे यांनी टीका केली. १५ लाख लोकसंख्या असलेल्या राज्याला ही निवडणूक पक्षीय पातळीवर नकोच होती. ग्रामपंचायतींनाही विश्वासात घेतले नाही. राज्यात मच्छीमारी बांधवांना पुरेशा जेटी नाहीत. त्यांच्यासाठी कोणतेही नियोजन नाही. राज्य माहिती आयुक्त नेमण्याबाबत भाष्य नाही. गोवा हे माहिती हक्क कायदा राबविणारे पहिले राज्य असताना ही स्थिती का, असा सवाल राणे यांनी केला.
स्वाईन फ्लूमुळे लोक बळी पडत आहेत. डॉक्टरांची पुरेशी व्यवस्था नाही. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे. १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना सेवेतून काढल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. त्यांना सेवेत घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
किनारपट्टीतील ड्रग्स व्यवसायावर आळा घालण्यात सरकारला अपयश आले आहे. पोलीस यंत्रणा सक्षम करा. देशभरात अन्यत्र चर्चवर हल्ले होताहेत. अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे. पोलीस भरतीत कडक निकष लावा, असे राणे म्हणाले. (पान २ वर)
सविस्तर वृत्तान्त/हॅलो १