‘त्या’ मंत्र्यांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 22, 2015 01:23 IST2015-07-22T01:23:22+5:302015-07-22T01:23:26+5:30
पणजी : जैका प्रकल्प-लुईस बर्जर लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) काही मंत्री व लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र

‘त्या’ मंत्र्यांविरुद्ध गुन्हा
पणजी : जैका प्रकल्प-लुईस बर्जर लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) काही मंत्री व लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, त्या मंत्र्यांच्या नावांचा उल्लेख टाळण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यापूर्वी सीआयडीच्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी
प्रधान अभियंते आनंद वाचासुंदर यांची तीन तास
कसून चौकशी करण्यात आली.
‘जैका’च्या गोव्यातील प्रकल्पात सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या लुईस बर्जर कंपनीने गोव्यातील माजी मंत्र्याला कंत्राट मिळविण्यासाठी लाच दिल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. सीआयडीकडून या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात वाचासुंदर यांची तीन तास चौकशी करतानाच त्यांच्याकडून महत्त्वाची माहितीही सीआयडीने मागवून घेतली. ‘जैका’कडून गोव्यात एकूण किती कामे करण्यात आली आहेत किंवा करण्यासाठी देण्यात आली आहेत आणि या संबंधीच्या कंत्राट प्रक्रियेत कोणते अधिकारी सहभागी होते, ही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. या संबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे घेऊन त्यांना सीआयडीकडून बोलावण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी ते सीआयडीच्या कार्यालयात हजर राहिले. रात्री उशिरापर्यंत ते सीआयडीच्या रायबंदर येथील कार्यालयात होते. अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या उपस्थितीत इतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली व नंतर गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)