२०३० नोकऱ्यांची निर्मिती; पर्वरीतील टाउन स्क्वेअर, फोंड्यातील संग्रहालय प्रकल्पासाठी १८८ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2024 12:15 IST2024-12-04T12:09:19+5:302024-12-04T12:15:31+5:30

या दोन्ही प्रकल्पांसाठी केंद्राने १८८.२२ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज मंजूर केले.

creation of 2030 jobs 188 crore sanctioned for town square in porvorim museum projects in ponda | २०३० नोकऱ्यांची निर्मिती; पर्वरीतील टाउन स्क्वेअर, फोंड्यातील संग्रहालय प्रकल्पासाठी १८८ कोटी मंजूर

२०३० नोकऱ्यांची निर्मिती; पर्वरीतील टाउन स्क्वेअर, फोंड्यातील संग्रहालय प्रकल्पासाठी १८८ कोटी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'केंद्र सरकारच्या व्याजमुक्त कर्जातून साकारणार असलेल्या फोंड्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि पर्वरी येथील टाउन स्क्वेअर या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून २०३० नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी केंद्राने १८८.२२ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज मंजूर केले.

पर्वरी येथील टाउन स्क्वेअर प्रकल्पावर ९०.७४ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्याद्वारे सुमारे २००० नोकऱ्या निर्माण होतील, असे सांगण्यात येत आहे. वॉचटॉवर, म्युझिकल फाउंटनसह पायाभूत सुविधा आणि इतर गोष्टी पर्यटकांचे तसेच स्थानिकांचे आकर्षण ठरतील.

केंद्र सरकारने विविध पर्यटन प्रकल्पांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य (एसएएससीआय) योजना तयार केली आहे. २३ राज्यांमध्ये एकूण ३,२९५ कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे. केंद्र सरकारच्या या विशेष साहाय्य योजनेद्वारे निधी मिळवण्यासाठी गेला बराच काळ गोवा सरकारचे प्रयत्न चालू होते. योजनेंतर्गत राज्यांना ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय

फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालयाच्या कामासह किल्ल्याचा विकास आणि नूतनीकरणावर सुमारे ९७.४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यातून ३० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. म्युझियममध्ये सुधारित रिअॅलिटी रूम, होलोग्राम, व्हर्चुअल रिअॅलिटी डिस्प्ले, फाइव्ही डी थिएटर आणि इंटरअॅक्टिव्ह एक्झिबिट्स, वॉर कॉस्च्युम गॅलरी, बोट गॅलरी, योगा पॅव्हेलियन, हॉर्स ट्रेल्स, लाइट अॅण्ड साउंड शो इत्यादींचा समावेश असेल.

काय आहे टाउन स्क्वेअर?

पर्यटकांना गोव्याचा समृद्ध वारसा आणि जीवनशैलीचा आस्वाद घेण्याच्या उद्देशाने पर्यटन खात्यातर्फे टाऊन स्क्वेअर प्रस्तावित स्तावित आहे. टाउन स्क्वेअरमध्ये तोर्डा येथील खाडी, एकोशी येथे रस्त्याच्या बाजूला फूड रॉक्स आणि इतर आकर्षणे असतील. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. समर्पित 'गोवा सांस्कृतिक अनुभव क्षेत्र विकसित केले जाईल. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की, या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये लागतील.

मुरगाव बंदरात मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय क्क्रुझ टर्मिनल

मुरगाव बंदरात १०२ कोटींचे आंतरराष्ट्रीय क्क्रुझ टर्मिनलचे बांधकाम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्यसभेत केंद्रीय जहाजोद्योग व बंदर, जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी लेखी उत्तरात दिली आहे. राज्य सरकारशी समन्वयाने गोवा माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी हब बनवण्यात येईल, असे सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला होता. राज्यात नऊ जेटी बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे माल वाहतुकीलाही वाव मिळेल. अंतर्गत जलमार्ग वाहतूक सुधारेल, असा दावा करण्यात आला आहे. सागरमाला योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय क्क्रुझ टर्मिनल तसेच फेरी टर्मिनल उभारण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचा खर्च १०१.७२ कोटी रुपये आहे. माल वाहतुकीत सुधारणा व्हावी, यासाठी सध्याच्या टर्मिनलचा विस्तार, संपर्क व्यवस्थेत वाढ, उपकरणे अद्ययावत करणे आणि अनुदान, कमी शुल्क आकारून जलवाहतुकीला चालना दिली जाणार आहे.

एमबीबीएस जागा वाढल्या 

दरम्यान, एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या गोव्यात एमबीबीएस प्रवेशासाठी जागा १५० वरून वाढवून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात २०० करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती तानावडे यांच्या अन्य एका प्रश्नावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

Web Title: creation of 2030 jobs 188 crore sanctioned for town square in porvorim museum projects in ponda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.