टी-शर्टचा खर्च सरकारी निधीतून नको
By Admin | Updated: February 6, 2016 03:05 IST2016-02-06T03:03:02+5:302016-02-06T03:05:43+5:30
मडगाव : येथील कार्निव्हल मिरवणुकीसाठी ‘माडांचे संवर्धन करा’ अशा आशयाचा संदेश देणारे टी-शर्ट सध्या वादाचा विषय बनला असून

टी-शर्टचा खर्च सरकारी निधीतून नको
मडगाव : येथील कार्निव्हल मिरवणुकीसाठी ‘माडांचे संवर्धन करा’ अशा आशयाचा संदेश देणारे टी-शर्ट सध्या वादाचा विषय बनला असून या टी शर्टवरील मजकूर सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याने या टी शर्ट्सचा खर्च सरकारी अनुदानातून करू नका, अशी सूचना मुख्याधिकारी सिध्दिविनायक नाईक यांनी नगराध्यक्षा बबिता प्रभूदेसाई यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी कार्निव्हल समितीचे कार्यकारी अध्यक्ष टिटो कार्दोज यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार माडांच्या विरोधात आहे का, असा सवाल केला आहे. जर तसे असेल तर सरकारने स्पष्ट करावे, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे.
‘माड वाचवा-गोवा वाचवा’ अशा आशयाचा संदेश असलेले टी-शर्ट घालून नगरसेवकांनी कार्निव्हलची पत्रकार परिषद घेतली होती. याचा उल्लेख मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात केला आहे. हा संदेश सरकारी धोरणाच्या विपरीत असून अशा आशयाची कृती आयोजनात करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. कार्निव्हलात माडाचे राजकारण आणल्याचा दावा करून या मिरवणुकीला दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करावे, अशी मागणी फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांनी गुरुवारी केली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, निर्वाणा कंपनीकडून तयार करून घेतलेल्या या टी-शर्ट्ससाठी आयोजकांना दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सरदेसाई व कार्दोज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माडांना वाचवा हा संदेश पर्यावरण बचावार्थ दिला असून या संदेशाची सरकारला भीती वाटते का, असा सवाल केला. जोपर्यंत सरकार माडाला ‘गवत’ करण्याची दुरुस्ती मागे घेत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यासपीठावर गोव्याचा हा ज्वलंत प्रश्न आणला जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले. केवळ कार्निव्हल मिरवणुकीमध्येच नव्हे तर आगामी शिगम्याच्या मिरवणुकीवेळीही आम्ही माडाचा प्रचार करू, असे सरदेसाई म्हणाले. माडाच्या बचावासाठी लवकरच माड अभियान हाती घेण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. शनिवारी वुई फॉर फातोर्डा या संघटनेमार्फत कार्निव्हल नृत्य रजनी आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमातही ‘माड संवर्धन’ हीच मुख्य संकल्पना असेल, असे त्यांनी सांगितले. या नृत्य रजनीच्यावेळी माडावर आधारित वेशभूषेला खास बक्षिसे देण्यात येतील, असे सरदेसाई यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)