पणजीत विना मास्क फिरताना १५ पर्यटकांना मनपाकडून दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 08:04 PM2020-09-13T20:04:09+5:302020-09-13T20:04:17+5:30

महापालिकेने आजतागायत सुमारे १५0 जणांना प्रत्येकी १00 रुपये दंड ठोठावला आहे

Corporation fines 15 tourists for walking without mask in Panaji | पणजीत विना मास्क फिरताना १५ पर्यटकांना मनपाकडून दंड 

पणजीत विना मास्क फिरताना १५ पर्यटकांना मनपाकडून दंड 

Next

पणजी : पर्यटक कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्याने महापालिकेनेही कारवाई आरंभली असून आज रविवारी सकाळी येथील मेरी इमेक्युलेट चर्चच्या परिसरात १५ पर्यटकांना तोंडावर मास्क न बांधल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. 

महापौर उदय मडकईकर म्हणाले की, ‘आजपावेतो मासळी मार्केट तसेच बाजारपेठेतच मनपा निरीक्षक कारवाई करीत होते. आता आम्ही बेशिस्त पर्यटकांवरही लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेने आजतागायत सुमारे १५0 जणांना प्रत्येकी १00 रुपये दंड ठोठावला आहे.’

पर्यटनस्थळांना भेट देणारे पाहुणे शारीरिक दुरी किंवा तोंडावर मास्क बांधणे आदी मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन करुन वावरतात. यामुळे कोविडचा फैलाव होण्याचा धोका आहे. आज सकाळी पर्यटकांचा एक गट येथील चर्च स्क्वेअरमध्ये विना मास्क सर्व नियम धाब्यावर बसवून वावरताना महापौरांच्या नजरेस पडला. तात्काळ त्यांनी निरीक्षकांना आदेश देऊन १५ पर्यटकांना दंड ठोठावला. 

‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना येथे आल्यावर कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही भान रहात नसल्याचे दिसून आले आहे. खास करून किनाऱ्यांवर घोळका करून दाटीवाटीने उभे राहणे, फोटोसाठी एकमेकांना खेटून बसणे, गर्दीतही चेहऱ्यावरील मास्क उतरविणे आदी प्रकार घडत आहेत. 

१ सप्टेंबरपासून आंतरराज्य सीमा खुल्या झालेल्या आहेत. तसेच राज्यातील बारही खुले झालेले आहेत. बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर किंवा किनाºयांवर मद्याच्या बाटल्या नेऊन खुलेआम दारूचे प्राशन केल्यानंतर तरुण पर्यटकांना कशाचेही भान राहत नाही. मार्गदर्शक तत्वांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. महापालिकेच्या हद्दीत मिरामार किनारा तसेच दोनापॉल जेटी येते. या दोन्ही पर्यटनस्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. महापालिकेचे निरीक्षक आता या दोन्ही ठिकाणीदेखिल करडी नजर ठेवून असणार आहेत, असे महापौरांनी सांगितले. 

Web Title: Corporation fines 15 tourists for walking without mask in Panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.