CoronaVirus News: गोव्यात साडेतीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:37 PM2020-11-24T12:37:26+5:302020-11-24T12:37:46+5:30

कुडचडे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १७ तर कासारवर्णे येथे फक्त ८ कोविडग्रस्त आहेत.

CoronaVirus News: Three and a half lakh covid tests will be completed in Goa | CoronaVirus News: गोव्यात साडेतीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार

CoronaVirus News: गोव्यात साडेतीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार

Next

पणजी: राज्यात सर्वत्र कोविड रुग्णांची संख्या घटली आहे. एकूण २६ आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात प्रत्येकी पन्नासहून कमी कोविड रुग्ण संख्या आहे. म्हणजे प्रमाण आता एवढे खाली आले आहे. राज्यात एकूण साडेतीन लाख कोविड चाचण्या येत्या महिन्यात पूर्ण होणार  आहेत.ज्या आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात अगोदर दोनशे किंवा अडिचशे कोविड रुग्णसंख्या होती, तिथे आता चाळीस किंवा पन्नास अशी रुग्ण संख्या झाली आहे. फक्त पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे भाग असे आहेत, जिथे प्रत्येकी पन्नासहून अधिक कोविड रुग्ण संख्या आहे.

मडगाव, वास्को, फोंडा, पणजी व पर्वरी या पाच ठिकाणी मिळून एकूण सुमारे सव्वा चारशे कोविडग्रस्त आहेत. सर्व पंचायत क्षेत्रांच्या ठिकाणी व ग्रामीण भागात कोविडग्रस्तांची संख्या प्रत्येकी पन्नासहून कमी आहेत. काही ठिकाणी तर केवळ सात ते दहा किंवा पंधरा- सोळाएवढेच कोविड रुग्ण आहेत. चिंबल व जुवारीनगर येथील झोपडपट्टीच्या परिसरातही कोविड रुग्ण संख्या घटली आहे. चिंबलला आता फक्त ५५ कोविडग्रस्त आहेत.

साखळीत दोन महिन्यांपूर्वी कोविडग्रस्तांची संख्या चारशेपर्यंत पोहचली होती. आता तिथे फक्त ३८ रुग्ण आहेत. डिचोलीत संख्या दीडशेहून अधिक होती. तिथे आता २३ कोविडग्रस्त आहेत. बेतकी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातही पूर्वी कोविड रुग्णांची संख्या वाढली होती. आता तिथे फक्त २३ कोविडग्रस्त आहेत. शिवोलीत ४१ तर कोलवाळे येथे २० कोविडग्रस्त आहेत. बाळ्ळी येथील आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात फक्त १० कोविडग्रस्त आहेत. लोटली येथे २१ रुग्ण आहेत.

तर सांगे आरोग्यकेंद्राच्या क्षेत्रात फक्त सात कोविडग्रस्त व्यक्ती आहेत. धारबांदोडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात बारा तर शिरोडा येथे २१ कोविडग्रस्त आहेत. कुडचडे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १७ तर कासारवर्णे येथे फक्त ८ कोविडग्रस्त आहेत. मये येथे दहा तर वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रात फक्त १६ कोविडग्रस्त आहेत.

राज्यात कोविडच्या चाचण्यांचे प्रमाण पुन्हा हळूहळू वाढत आहे. रोज सरासरी दीड हजार कोविड चाचण्या आता होत आहेत. आतापर्यंत एकूण ३ लाख ३५ हजार व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. एकूण ४७ हजार कोविडग्रस्त आढळले व त्यापैकी ४५ हजारहून जास्त कोविडग्रस्तांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली.येत्या दहा ते पंधरा दिवसांत राज्यात एकूण साडेतीन लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार आहेत. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत चाचण्यांचे हे प्रमाण मोठे आहे.

Web Title: CoronaVirus News: Three and a half lakh covid tests will be completed in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.