coronavirus: सरकारने कोविडवर चर्चा नाकारली, गोव्यात विरोधकांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:55 PM2020-07-27T14:55:53+5:302020-07-27T14:57:02+5:30

सोमवारी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन पार पडले. पुरवणी मागण्या व 21 हजार कोटींहून जास्त रक्कमेचा अर्थसंकल्प चर्चेविना संमत झाला.

coronavirus: Govt refuses to discuss Covid, protests in Goa | coronavirus: सरकारने कोविडवर चर्चा नाकारली, गोव्यात विरोधकांचा हल्लाबोल 

coronavirus: सरकारने कोविडवर चर्चा नाकारली, गोव्यात विरोधकांचा हल्लाबोल 

Next

पणजी - कोविडविषयी चर्चा व्हावी म्हणून विरोधी आमदारांनी जो स्थगन प्रस्ताव मांडला होता, तो प्रस्ताव तांत्रिक कारणावरून सभापतींनी फेटाळून लावला. यामुळे विरोधी आमदारांनी संघटीत होत सरकारविरुद्ध हल्लाबोल केला. सभापतींच्या आसनासमोर येत विरोधकांनी शेम, शेमच्या घोषणाही दिल्या. सरकारने गोंधळातच विधानसभा अधिवेशनातील कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभापतींनी विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याची प्रक्रिया पार पाडली.

सोमवारी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन पार पडले. पुरवणी मागण्या व 21 हजार कोटींहून जास्त रक्कमेचा अर्थसंकल्प चर्चेविना संमत झाला. विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व मगोप व अपक्ष यांनी मिळून स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. राज्यातील कोविडस्थितीविषयी अगोदर चर्चा करूया, कोविड व्यवस्थापनाविषयी बोलूया असे विरोधकांचे म्हणणो होते. अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच सभापती राजेश पाटणोकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. विरोधी आमदारांनी त्यावेळी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास पार पडला. त्यानंतर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाचा व कोविड चर्चेचा विषय उपस्थित केला.

आपण स्थगन प्रस्ताव आता घेऊ शकत नाही अशी भूमिका सभापतींनी घेतली. यावेळी दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड, रोहन खंवटे आदी आमदार सभापतींच्या आसनासमोर गेले. आम्हाला कोविडविषयी चर्चा हवी आहे असा आग्रह विरोधी आमदारांनी धरला. यावेळी गोंधळ झाला. सुदिन ढवळीकर, रवी नाईक, लुईङिान फालेरो, प्रतापसिंग राणो आदी सर्वच विरोधी आमदार आपल्या जागेवरून उठले व सभापतींसमोर आले. सरकारविरुद्ध घोषणांचा जोर वाढला. यावेळी आपण तांत्रिक कारणास्तव स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे सभापतींनी जाहीर केले. स्थगन प्रस्तावाची नोटीस देताना एकाच विषयावर चर्चेसाठी ती द्यायची असते, तुम्ही कोविड व राज्याची आर्थिक स्थिती अशा दोन विषयांवर चर्चा हवी असे नोटीशीत म्हटले आहे, त्यामुळे आपण नोटीस फेटाळत असल्याचे सभापतींनी जाहीर केले. यावेळी विरोधी आमदारांनी शेम, शेमच्या घोषणा दिल्या.

राज्यात कोविडची स्थिती गंभीर असल्याने आताच चर्चा हवी, सरकार लोकशाहीची हत्त्या करतेय असे सरदेसाई म्हणाले. मात्र सरकार कोविडविषयी बोलायला तयार आहे, मुख्यमंत्री स्वत: विधान करतील, अगोदर पुरवणी मागण्या व अर्थसंकल्प असे कामकाज पार पाडूया असे सभापतींनी सूचविले. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणबाजी सुरू ठेवली. कामकाज पुढे नेण्यात यामुळे व्यत्यय येत होता. काही विरोधी आमदार सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून सभापती बसतात, त्या खुर्चीच्या ठिकाणीही जाऊ पाहू लागले. सभापती व विरोधी आमदार यांच्यात फक्त एक मीटरचे अंतर होते. स्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे सभापतींच्या लक्षात आले. त्यांनी विरोधी आमदारांना तुमच्या जागेवर जाऊन बसा असे शेवटचे आवाहन केले व शेवटी मार्शलना बोलावून त्यांना सभागृहाबाहेर काढले. विरोधकांच्या अनुपस्थितीत मग सरकारने अधिवेशनाचे उर्वरित कामकाज पार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव व सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी विरोधकांना साथ दिली नाही. ते निषेधात सहभागी झाले नाही. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व अन्य विरोधी आमदारांनी दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपालांचीही भेट घेतली.
 
सरकार कोविड व्यवस्थापनात कमी पडलेले नाही. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही असे आपण पुन्हा एकदा सांगतोय. कोविडच्या स्थितीवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही पारदर्शक आहोत. कोविड आहे म्हणून आम्ही मागे राहिलेलो नाही. जेव्हा सामान्य स्थिती असते तेव्हा अधिवेशन जास्त दिवसांचे घेता येते. अर्थसंकल्पावर तेव्हा चर्चा करता येते. पण सध्या स्थितीच वेगळी आहे, असामान्य आहे. कोविडमुळे अधिवेशन जास्त दिवसांचे घेता येत नाही. कोविडविषयी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत पण अगोदर अर्थसंकल्प मंजुर व्हावा. कारण कोविड व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्प मंजुरीचीही गरज असते.
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

Web Title: coronavirus: Govt refuses to discuss Covid, protests in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.