छत्रपतींप्रश्नी भेंब्रेंच्या विधानाचा वाद वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:07 IST2025-03-02T13:06:44+5:302025-03-02T13:07:44+5:30
दोन्ही बाजूने लोकांमध्ये विविध चर्चा : राजकारणीही उतरले मैदानात; कोंकणी भाषा मंडळाकडून सरकारवर दोषारोप

छत्रपतींप्रश्नी भेंब्रेंच्या विधानाचा वाद वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव / पणजी:छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी केल्यानंतर शिवरायांच्या सैनिकांनी तेथील खजाना नेताना महिला व मुलांनाही ते घेऊन गेले होते, अशा अर्थाचे विधान लेखक उदय भेंब्रे यांनी केल्यानंतर लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भेंब्रे यांच्या घरी जाऊन जमावाने वाद घालणे लोकांना मान्य नाही. तसेच भेंद्रे यांची विधानेदेखील खोटी असल्याची भावना उत्तर गोव्यात व्यक्त होऊ लागली आहे.
भेंद्रे यांच्या विधानांचा वाद वाढू लागला आहे. या वादात काल आमदार विजय सरदेसाई यांनीही उडी टाकली. त्यानंतर लगेच भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी सरदेसाई यांना प्रत्युत्तर दिले आहे. माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनीही भेंद्रे यांच्या विधानांचा निषेध केला आहे.
भैबेंच्या भूमिकेबाबत खेद वाटतो: वेलिंगकर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंडळी समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी विधाने करत असून आता त्यांच्या पंक्तीला उदय भेंब्रेही जाऊन बसल्याने मनाला खेद वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. शिवराय हे पोर्तुगीजांचे मित्र होते. त्यांनी पोर्तुगीजांना हाकलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. बार्देशवरील स्वारीवेळी त्यांनी बायकामुले पळवून नेली. तीन पार्टीना ठार मारले, अशी वक्तव्य करून भेंब्रे यांनी गोमंतकीयांची प्रतारणा केली आहे. राज्यात दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान रचले जात असून गोमंतकीयांनी सावध राहावे, असे आवाहन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
राजवट नव्हती म्हणणे चुकीचे : सचिन मदगे
सचिन मदगे यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे या तालुक्यात प्रभाव दिसून येतो. नंतर त्यांनी फोंडा, सांगे, केपे भागातही आपला प्रभाव दाखवला. सप्तकोटेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण केले याविषयी काही बोलायचे नाही. चुकीचा आणि खोटा इतिहास वाचून शिवाजी महाराजांची गोव्यात काही राजवट नव्हती, असे सांगणे चुकीचे आहे.
भेंब्रे वस्तुस्थितीला धरून बोलतात : विजय
अॅड. उदय भेंद्रे हे जे काही बोलतात व लिहितात ते वस्तुस्थितीला धरून असते. ते कोणत्याही अभ्यासाशिवाय बोलत नाहीत. जर कोणाला त्यांची विधाने चुकीची वाटत असतील तर त्यांनी ती पुराव्यानिशी खोडावीत. रात्रीच्यावेळी भेंब्रे यांच्या घरी जाऊन वाद घालणे निषेधार्ह असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
हा सरदेसाईंचा ढोंगीपणा : वेर्णेकर
विजय सरदेसाई यांनी मंत्री झाल्यावर भारतीय संविधानाची शपथ घेतली. आता ते गोव्याच्या भारतीयीकरण'वर चिंता व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या ढोंगीपणाला मर्यादाच राहिलेल्या नाहीत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याने महिलांचे अपहरण केल्याबद्दलच्या खोट्या गोष्टींना ते समर्थन कसे काय देतात का? एका महान मराठा राजाविरुद्ध भेंब्रे यांनी केलेल्या अपमानावर ते गप्प का आहेत? असा प्रश्नही वेर्णेकर यांनी सरदेसाई यांना केला. पोर्तुगीजधार्जिणा इतिहास सरदेसाई यांना लाभदायक असू शकतो, परंतु हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही वेर्णेकर यांनी म्हटले आहे.
कोंकणीवाद्यांची भेंब्रे यांच्या घरी बैठक
अॅड. उदय भेब्रे यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री-अपरात्री त्यांना त्रास देणाऱ्या घटनेचा कोंकणी भाषा मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच रविवारी उदय भेंब्रे यांच्या घरी याबाबत निषेध बैठक घेणार असल्याची माहिती दिली.