जलस्रोत जपून ठेवण्यासाठी सहकार्य करावे; सुभाष शिरोडकर यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2024 14:53 IST2024-02-21T14:52:31+5:302024-02-21T14:53:09+5:30
वाजे-शिरोडा येथे श्री मंडलेश्वर मंदिरासमोर असलेल्या तलावाची दुरुस्ती व सौंदर्गीकरणाच्या कामाचा प्रारंभ मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

जलस्रोत जपून ठेवण्यासाठी सहकार्य करावे; सुभाष शिरोडकर यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गावातील मंदिरांसमोर असलेल्या तळी, झरे एकेकाळी गावातील लोकांची पाण्याची गरज भागवण्याचे काम करत होते. या तळ्यामधून केवळ पिण्यासाठी नव्हे तर बागायती, कुळागरासाठीही पाणीपुरवठा केला जात होता. हे नैसर्गिक जलस्रोत आज जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या तलावांचे बांधकाम करून त्याची स्वच्छता व निगा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
वाजे-शिरोडा येथे श्री मंडलेश्वर मंदिरासमोर असलेल्या तलावाची दुरुस्ती व सौंदर्गीकरणाच्या कामाचा प्रारंभ मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष राजू प्रभू गावकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, सरपंच पल्लवी शिरोडकर, पंचायत सदस्य सुहास नाईक, शिरोडा भाजप अध्यक्ष सूरज नाईक, पुरोहित महेश परांजपे, बबन शिरोडकर, चंद्रकांत हेदे, अभियंते सचिन शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दुरुस्ती व सौंदर्गीकरण करण्याच्या कामासाठी सुमारे ३२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते भूमिपूजन तसेच श्रीफळ वाढवून या कामाची सुरुवात झाली. यावेळी पल्लवी शिरोडकर यांनी स्वागत केले तर सुहास नाईक यांनी आभार मानले. यावेळी सुरज नाईक यांनी सांगितले की, या कामासाठी आवश्यक ना हरकत दाखला आणून देताच मंत्री शिरोडकर फार कमी वेळत सर्व सरकारी सोपस्कर पूर्ण करून घेतले. आज हे काम सुरू होत असल्याबद्दल आनंद होत आहे.