मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्याचा परिणाम
By Admin | Updated: November 9, 2015 01:23 IST2015-11-09T01:23:11+5:302015-11-09T01:23:22+5:30
पणजी : भाजपने मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्यास काय घडू शकते हे बिहारच्या निकालांनी दाखवून दिले आहे, असा

मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्याचा परिणाम
पणजी : भाजपने मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्यास काय घडू शकते हे बिहारच्या निकालांनी दाखवून दिले आहे, असा टोला सत्तेत सहभागी असलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष मंत्री दीपक ढवळीकर यांनी हाणला. दिवाळीनंतर पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक होणार असून २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती ठेवावी की नाही याबाबत चर्चा होईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मित्रपक्ष असल्याने मगोची अपेक्षा आहे की भाजपने प्रत्येक कामात विश्वासात घ्यायला हवे; परंतु तसे होताना दिसत नाही.
बिहारमध्ये याच प्रवृत्तीचा परिणाम भाजपला भोगावा लागला आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मगोची काय भूमिका असणार आहे, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा होईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
गोव्यात परिणाम नाहीच : विनय तेंडुलकर
बिहारच्या निकालांचा गोव्यात कोणताही परिणाम होणार नाही; कारण येथे भाजपचे काम तळागाळापर्यंत पोचले आहे, असा दावा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला. ते म्हणाले की, ‘पक्षाने बिहारमधील पराभव मान्य केला आहे. त्यातून बोधही घेऊ. नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव हे दोन माजी मुख्यमंत्री एकत्र आले. या दोघांचीही स्वत:ची व्होट बँक तेथे आहे, त्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला. काही राज्यांमध्ये भाजप अजून तळागाळापर्यंत पोचलेला नाही. गोव्यात तशी स्थिती नाही. येथे बुथ स्तरापर्यंत पक्षाचे काम पोचलेले आहे. सध्या राज्यात पक्षाचे अभ्यासवर्ग चालू आहेत. रविवारी दक्षिण गोव्यातील पाच मतदारसंघांसाठी झालेल्या अभ्यासवर्गांना मी उपस्थित होतो. सर्वत्र भाजपला चांगला प्रतिसाद आहे.’ (प्रतिनिधी)