सक्षम नेतृत्वाचा काँग्रेसचा नारा
By Admin | Updated: December 29, 2014 01:48 IST2014-12-29T01:43:39+5:302014-12-29T01:48:40+5:30
स्थापनादिन : शंभर नेते तयार करण्याची फालेरोंची मडगावात घोषणा

सक्षम नेतृत्वाचा काँग्रेसचा नारा
मडगाव : सक्षम नेतृत्वाचा नारा काँग्रेसने सुरू केला असून रविवारी पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वक्षमता असलेले शंभर नेते तयार केले जातील, असे सांगितले. भविष्यात प्रबल दर्जेदार नेतृत्व निर्माण करण्याची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे असलेली क्षमता पुढे नेण्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवे नेतृत्व पुढे यायला पाहिजे, असे फालेरो म्हणाले. काँग्रेस महिला समिती कमकुवत झाल्याचेही मान्य करताना त्याला बळकटी देण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त मडगावातील दक्षिण गोवा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात फालेरो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मडगावचे आमदार दिगंबर कामत, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस गिरीश चोडणकर, माजी मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस, माजी आमदार श्याम सातार्डेकर, उपाध्यक्ष मोती देसाई, एम.के. शेख व दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्म समावेशक पक्ष असून सर्वात जुना असलेला हा पक्ष केवळ पक्ष नसून एक चळवळ आहे. काँग्रेस पक्षाची व देशाची घटना एक आहे. पक्षासमोर एक मोठे आव्हान आहे. जे सरकार सध्या केंद्रात तसेच राज्यात सत्तेवर आहे त्यांची ध्येयधोरणे काय आहेत हे कुणालाच माहीत नाही. एका बाजूने नाताळाची सुट्टी रद्द करून गुड गव्हर्नस दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला जातो, हे चुकीचे आहे. देशात सर्व जातीधर्माचे लोक असून हीच भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. धर्माच्या नावाने फूट घालणे हेच सत्तेवर असलेल्या पक्षाला माहिती आहे. हा लोकशाहीला धोका आहे. धर्मांध पक्षाला आळा घालणे हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर आता सर्वात मोठे आव्हान आहे. काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरण, तत्त्व, कार्यक्रम यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला जागृत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्षाबरोबर जे कार्यकर्ते आज निष्ठावंत राहिले अशांना बरोबर घेऊन पक्ष मजबूत करून पुढील वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले असले तरी त्यांची परवा न करता नवीन कार्यकर्त्यांना जोडून पक्ष बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस पक्षाने मागील कामाचा आढावा घेऊन पुढील मार्गक्रमण कोणत्या दिशेने करणार यासाठी आताच पावले उचलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी गोव्यात भाजपा सरकारने घेतलेले यू-टर्न आता केंद्रातही पोहचले असून सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतो याची प्रचीती नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत दिसून आली आहे. गोव्यात पुन्हा काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. प्रादेशिक आराखडा, दयानंद निराधार योजना यांसारखे लोकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कामाला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एक यादी तयार करावी व दरवर्षी पक्षाच्या बैठकीत त्याचा आढावा घेण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी एम.के. शेख यांनीही आपले
विचार मांडले. (प्रतिनिधी)