काँग्रेसकडून रवींना कारणे दाखवा नोटीस?
By Admin | Updated: May 25, 2014 01:06 IST2014-05-25T01:06:25+5:302014-05-25T01:06:47+5:30
काँग्रेसकडून रवींना कारणे दाखवा नोटीस?

काँग्रेसकडून रवींना कारणे दाखवा नोटीस?
पणजी : आपल्या पराभवास रवी नाईक यांनी काँग्रेसचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जबाबदार धरल्याने काँग्रेस पक्षाने या प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली आहे व नाईक यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचे ठरविले आहे. गेल्या दहा वर्षांत यूपीए सरकारने दिलेले योगदान लोकांसमोर मांडण्याबाबत पंतप्रधान सिंग हे कमी पडले व त्यामुळे काँग्रेसविरोधी लाटेत आपला पराभव झाला, असे विधान उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढविलेल्या नाईक यांनी गेल्या आठवड्यात केले होते. शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी सांगितले की, रवी नाईक यांना लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहेत. पक्षविरोधी कारवाया करणार्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष फर्नांडिस यांना दिले आहेत. कुठलाही काँग्रेस नेता स्वत:चे मत व्यक्त करू शकतो; पण हे मत काँग्रेसच्या व्यासपीठावर किंवा बंद खोलीआड होणार्या बैठकीत व्यक्त करायला हवे. पक्षाविरुद्ध विधाने करायची असल्यास कुणीही अगोदर पक्ष सोडायला हवा, असे कामत म्हणाले. फोंडा विकास समितीनेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध शुक्रवारी विधाने केली आहेत. जॉन फर्नांडिस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या समितीने केली आहे. फोंडा विकास समितीला राजकीय भूमिका नाही किंवा राजकारणात स्थान नाही. या समितीने केलेल्या विधानांमागील बोलविता धनी कोण, ते समितीने सांगावे. रवी नाईक यांच्या सांगण्यावरून समितीने विधाने केली आहेत काय तेही स्पष्ट करावे, असे कामत म्हणाले. (खास प्रतिनिधी)