१५ आॅक्टोबरनंतरच काँग्रेस गट समित्या
By Admin | Updated: October 6, 2014 02:02 IST2014-10-06T02:01:45+5:302014-10-06T02:02:44+5:30
महाराष्ट्र, हरियाणातील निवडणुकांमुळे शिक्कामोर्तब रखडले

१५ आॅक्टोबरनंतरच काँग्रेस गट समित्या
पणजी : काँग्रेस गट समित्यांचे पुनर्गठन महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांमुळेच रखडले असून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच पक्षप्रभारी दिग्विजय सिंह हे निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने येत्या १५ तारखेनंतरच प्रदेशाध्यक्षांनी सादर केलेल्या नावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या चाळीसही गट समित्यांची पुनर्रचना केली जाणार असून प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी गेल्या २२ सप्टेंबर रोजी गटाध्यक्ष तसेच दोन्ही जिल्हाध्यक्षांची नावे श्रेष्ठींना सुचविली आहेत. या गट समित्या हंगामी असतील. पुढील वर्षी आॅगस्टमध्ये पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याने वर्षभराच्या काळासाठीच या समित्या अस्तित्वात असतील.
दरम्यान, काँग्रेसचे स्थानिक नेते सोमवारी शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी रवाना होत असल्याची माहिती जॉन यांनी दिली. यात प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर, खजिनदार शंभू भाऊ बांदेकर, सरचिटणीस उल्हास परब, सचिव वामन चोडणकर यांचा समावेश आहे. सावंतवाडीत कोकणी भाषिक विभागात आपणही प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)