'काँग्रेस दलालांचा दलाल!', कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 02:23 PM2020-10-04T14:23:20+5:302020-10-04T14:24:23+5:30

Prakash Javadekar: केंद्रात संमत झालेल्या कृषी कायद्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच अन्य विरोधी पक्षांकडून जो विरोध होत आहे, त्यावर केंद्राची बाजू  मांडण्यासाठी ५० मंत्री देशभरात फिरत आहे.

'Congress brokers' brokers!', Prakash Javadekar's attack Congress on agricultural laws | 'काँग्रेस दलालांचा दलाल!', कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

'काँग्रेस दलालांचा दलाल!', कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

Next

पणजी : कृषी कायद्यांना विरोध करणारा काँग्रेस पक्ष दलालांचा दलाल असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. ते म्हणाले की, देशात कृषी सुधारणा विधेयक आणण्यासाठी प्रस्ताव काँग्रेसचाच होता. आता या कायद्यांना जो विरोध चालला आहे, तो राजकीय आहे.

केंद्रात संमत झालेल्या कृषी कायद्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच अन्य विरोधी पक्षांकडून जो विरोध होत आहे, त्यावर केंद्राची बाजू  मांडण्यासाठी ५० मंत्री देशभरात फिरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जावडेकर हे शुक्रवारी सायंकाळी उशिरा गोव्यात आले होते. आज त्यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थन करताना जावडेकर म्हणाले, "शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढावी, कृषी मालाचा दर स्वतः शेतकऱ्यांना ठरविता यावा, शेतकी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी, कृषीमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, शेत जमिनीची मालकी शेतकऱ्यांकडेच रहावी या उद्देशाने ही विधेयके संमत केलेली आहेत. या कायद्यांमुळे खरे म्हणजे शेतकऱ्यांचा अधिकाधिक फायदाच होईल आणि दलाल नेस्तनाबूत होतील. नवनवे तंत्रज्ञान या क्षेत्रात येईल. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल."

याचबरोबर, देशातून अधिकाधिक निर्यात व्हावी, अशी अपेक्षा आहे. कृषी मालाची साठवणूक करता येईल तसेच निर्यातीवर निर्बंध राहणार नाहीत, असे जावडेकर म्हणाले. साठेबाजीमुळे बाजारात कृषी मालाचे दर वाढणार नाहीत का? या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, 'मुबलक उत्पादन होणार असल्याने टंचाई निर्माण होण्याचा किंवा दर वाढण्याचा प्रश्नच नाही.काँग्रेस दलालांची तळी उचलून धरीत आहे.'

म्हापसा येथे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, आंदोलन करणारे खरोखरच शेतकरी होते की काय? हा प्रश्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी राजकीय स्वार्थासाठी आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाचा २०१४ आणि २०१९  लोकसभा निवडणूक जाहीरनामा तपासावा. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांची कृषी सुधारणांवरील भाषणे ऐकावीत. या प्रश्‍नावर कॉंग्रेस आता 'यू-टर्न' घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला. राज्यसभेत ही विधेयके संमतीसाठी आली तेव्हा काँग्रेसी खासदारांचे वर्तन आक्षेपार्ह होते, असे ते म्हणाले. देशातील ६० टक्के लोक कृषी क्षेत्राशी संबंधित आहे आणि एकूण घरेलू उत्पन्न केवळ दहा ते १५ टक्के एवढेच आहे, ते वाढायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
 

Web Title: 'Congress brokers' brokers!', Prakash Javadekar's attack Congress on agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.