पावाच्या दराबाबत गोंधळ
By Admin | Updated: July 5, 2016 02:11 IST2016-07-05T02:11:58+5:302016-07-05T02:11:58+5:30
पणजी : राज्यात पावाच्या दराबाबत सध्या गोंधळाचे वातावरण आहे. काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी तीन रुपये आकारले जातात.

पावाच्या दराबाबत गोंधळ
पणजी : राज्यात पावाच्या दराबाबत सध्या गोंधळाचे वातावरण आहे. काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी तीन रुपये आकारले जातात. हॉटेलवाल्यांनी भाजी-पावाचे दर वाढवले आहेत. बेकरीमालकांमध्ये पावाच्या दराबाबतच्या प्रश्नावर फूट आहे. दर फरकाचा फटका मात्र सामान्य ग्राहकांना बसत आहे.
आॅल गोवा बेकर्स अॅण्ड कॉन्फेक्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी, दरवाढ स्थगितही ठेवलेली नाही किंवा मागेही घेतलेली नाही असे स्पष्ट करीत ६0 ग्रॅमचा पाव आम्ही ५ रुपयांना विकत आहोत, असे सांगितले. ते म्हणाले की, मैदा १३00 रुपये क्विंटल झाला आहे. भट्टीला लागणारी जळावू लाकडेही महागली आहेत, त्यामुळे हा व्यवसाय परवडणारा राहिलेला नाही. ग्राहकांवरही अन्याय होऊ नये यासाठी ६0 ग्रॅमचा मोठा पाव आम्ही पाच रुपयांना देतो.
बेकर्समध्ये दराच्या प्रश्नावर फूट असल्याचे व काहीजण ३ रुपयाने पाव देत असल्याचे फर्नांडिस यांनी मान्य केले; परंतु वजनात फरक असल्याचा दावा त्यांनी केला. ३ रुपयांचा पाव ३0 ग्रॅमचा व लहान असतो, असे त्यांनी सांगितले. त्यापेक्षा अधिक वजनाचा पाव ३ रुपयांना देणे परवडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
फर्नांडिस म्हणाले की, बेकरीवाल्यांच्याही अनेक समस्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व बेकरींना जल, हवा प्रदूषण कायद्यांतर्गत परवाने घेणे सक्तीचे केले तेव्हा आपण अध्यक्षांची भेट घेऊन मुदत मागितली. ३१ डिसेंबर २0१५ रोजी मुदत संपत होती, त्या पूर्वसंध्येला अध्यक्षांना भेटून सहा महिने मुदतवाढ मिळवली. आता आणखी सहा महिने वाढवून घेतले आहेत. बेकरी व्यावसायिकांसाठी काहीच न करणारे आणि स्वत:ला नेते म्हणवून घेणारे आडमुठे धोरण स्वीकारीत असल्याची टीका त्यांनी केली.
प्राप्त माहितीनुसार, आॅल गोवा असोसिएशन आॅफ बेकर्स ही बेकरी व्यावसायिकांची अन्य एक संघटना असून आगापितो मिनेझिस हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. मात्र, बहुतांश बेकरीवाले आपल्या संघटनेशी संलग्न असल्याचा दावा पीटर फर्नांडिस यांनी केला आहे.
(प्रतिनिधी)