मडगावात दारू तस्करीत वर्चस्वासाठी संघर्ष
By Admin | Updated: December 8, 2014 02:00 IST2014-12-08T01:57:59+5:302014-12-08T02:00:21+5:30
कोकण रेल्वेत भलताच उद्योग : प्रकारांत वाढच, आतापर्यंत लाखोंची दारू जप्त

मडगावात दारू तस्करीत वर्चस्वासाठी संघर्ष
सूरज पवार - मडगाव : सामान्य माणसाचे दळणवळणाचे मुख्य साधन असलेला कोकण रेल्वे मार्ग दारू तस्करांसाठी नंदनवन ठरू लागला आहे. या धंद्यात गुंतलेल्यांत वर्चस्वासाठी जीवघेणी स्पर्धा लागत असून जुलै महिन्यात या तस्करीमध्ये गुंतलेल्या दोन गटांनी भर रस्त्यावरच हाणामारी करून संघर्षाची झलकही दाखवून दिली होती.
कोकण रेल्वे मार्ग दारूच्या तस्करीसाठी सोयीस्कर बनत चालला आहे. या गैरव्यवहारात सध्या किमान चार गँग कार्यरत आहेत. त्यांच्यात धंद्यातील वर्चस्वासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. दोन वर्षांमागे अशाच एका घटनेत पोलिसांना टिप्स देत असल्याच्या संशयावरून चारजणांना बेदम मारहाण करण्यात आली होती, तर जुलै महिन्यात मालभाट येथे भर रस्त्यावर दोन गँगनी समोरासमोर येऊन राडा केला होता. या वेळी चाकू, दंडुक्यांचाही वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
मालभाट येथे सुजित सिंग व कृष्णा पिल्ले या दोन गटांत ही हाणामारी झाली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही गट दारूच्या तस्करीत गुंतलेले आहेत. कोकण रेल्वेचा दवर्ली येथील वॉशिंग प्लांट हा सध्या दारूच्या तस्करीचा अड्डा बनल्याचे वृत्त आहे.
या धंद्यात अल्प वेळेत बक्कळ पैसा मिळत असल्याने वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
काही वर्षांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने दारू तस्करीसाठी पावले उचलली होती. त्यातून या अधिकाऱ्याला गोळीबारही करावा लागला होता. त्यात एका इसमाचा खून झाल्यानंतर माागहून त्या अधिकाऱ्याला खुनाच्या गुन्हाखाली तुरुंगातही जावे लागले होते. मात्र, अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता कोकण रेल्वे पोलीस विभाग तसेच रेल्वे सुरक्षा दलाला आतापासून मोहीम उचलून दारूच्या तस्करीत गुंतलेल्यांचा बिमोड करावाच लागेल.
कोकण रेल्वेच्या माध्यमातून परराज्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या शेजारील राज्यांबरोबरच गुजरातातही दारू पोहचवली जाते.
पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात दारू जप्त केल्याने दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दारूच्या तस्करीत काही रेल्वे कर्मचारी गुंतल्याचे विदारक सत्य एका कारवाईत आढळून आले होते. चिपळूण येथील चार रेल्वे कर्मचारीच पोलिसांच्या एका कारवाईत सापडले होते. या कर्मचाऱ्यांना दारूच्या बाटल्यांसह कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.
रेल्वे पोलिसांनी जानेवारी महिन्यात एका प्रवाशाकडून ३० हजारांची दारू जप्त केली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये रेल्वेतून दारूची तस्करी करत असल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी प्रदीप पांडे याला अटक केली होती. त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यातही मध्यरात्री हाच संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. त्याच्या अन्य दोन साथिदारांसमवेत ९० हजार किंमतीच्या दारूसह पोलिसांनी या संशयितला जेरबंद केले होते.
गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेश येथील राजू सिंग याला अटक करून त्याच्याकडून २, ८८० रुपये किमतीची दारू जप्त केली होती. त्यानंतर मे महिन्यात रिमा दा कॉस्ता याला ताब्यात घेऊन १०,५४० रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली होती.
दारूच्या तस्करीमध्ये गुंतलेले अनेकजण सर्वसामान्य डब्यांत दारू ठेवून आपण मात्र दुसऱ्या बोगीतून प्रवास करतात, असेही पोलिसांना तपासात आढळून आले आहे.