‘गोव्यातील ख्रिस्तींच्या फेरधर्मांतरास संघ अनुकूल’
By Admin | Updated: December 29, 2014 01:49 IST2014-12-29T01:41:31+5:302014-12-29T01:49:26+5:30
संघाचे पश्चिम क्षेत्राचे बौद्धिक विभागप्रमुख शरद कुंटे

‘गोव्यातील ख्रिस्तींच्या फेरधर्मांतरास संघ अनुकूल’
पणजी : गोव्यात पोर्तुगीज राजवटीत सक्तीने धर्मांतराने ख्रिस्ती झालेल्यांचे फेरधर्मांतर करून त्यांना हिंदू बनविण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनुकूल असल्याचे संघाचे पश्चिम क्षेत्राचे बौद्धिक विभागप्रमुख शरद कुंटे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
संघाच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित शिबिरासाठी ते गोव्यात आलेले आहेत. फेरधर्मांतरासाठी संघ प्रत्यक्ष काही करणार नाही; परंतु इच्छुकांना मार्गदर्शन मात्र करील, असे ते पुढे म्हणाले. ‘कोणालाही पुन्हा हिंदू धर्मात यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे कुंटे म्हणाले. पोर्तुगिजांनी हजारो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले. पोर्तुगीज आता येथे नाहीत; परंतु त्यांच्या पिढ्या आहेत. सक्तीने धर्मांतर झालेल्यांना ख्रिस्ती म्हणूनच राहायचे असेल तर त्यालाही कोणाची हरकत असण्याचे कारण नाही.
पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५0 वर्षे राज्य केले. राज्यात १५ लाख लोकसंख्या असून, त्यातील २६ टक्के ख्रिस्ती आहेत. संघाच्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाचा धर्मांतराशी काहीच संबंध नसल्याचा दावा त्यांनी एका प्रश्नावर केला. ज्यांना पुन्हा हिंदू धर्मात यायचे आहे त्यांना आम्ही केवळ मार्ग दाखवतो, असे ते म्हणाले. संघाशी संबंध असलेल्या काही उजव्या हिंदू संघटनांनी ईशान्येतील राज्यांमध्ये फेरधर्मांतराचे कार्यक्रम सुरू केल्याने देशभर खळबळ माजली आहे. राज्यसभेत या प्रश्नावर विरोधकांनी कामकाज रोखून धरण्याचे प्रकारही घडले आहेत. (प्रतिनिधी)