समान मच्छीमारी बंदी काळाला राज्यात संघटनांचा सशर्त पाठिंबा

By Admin | Updated: September 21, 2014 02:12 IST2014-09-21T02:11:26+5:302014-09-21T02:12:28+5:30

केरळपासून गुजरातपर्यंत निर्बंध लागू करण्याची अट

Conditional support to the organizations in the state for the same fishery ban period | समान मच्छीमारी बंदी काळाला राज्यात संघटनांचा सशर्त पाठिंबा

समान मच्छीमारी बंदी काळाला राज्यात संघटनांचा सशर्त पाठिंबा

पणजी : पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांसाठी समान मच्छीमारी बंदी लागू करण्यास तसेच बंदीचा काळ वाढवून तो ७५ दिवस करण्यास मच्छीमार संघटनांना कोणतीही हरकत नाही; परंतु बंदीच्या काळात लहानांपासून मोठ्या होड्यांपर्यंत आणि केरळपासून गुजरातपर्यंत ही बंदी लागू करण्यात यावी, अशी त्यांची अट आहे.
या ७५ दिवसांच्या बंदी काळात मासेमारीला पूर्ण बंदी असावी, केरळ ते गुजरातपर्यंत कोणीही समुद्रात मासेमारी करता कामा नये. असे असेल तरच या बंदीचा सन्मान राखू, असे राज्यातील मोठी मच्छीमार संघटना असलेल्या मांडवी मच्छीमार असोसिएशनचे अध्यक्ष मिनिनो आफोन्सो यांनी दै. लोकमतशी बोलताना सांगितले.
या बंदीतून मोटरवर चालणाऱ्या लहान होड्याही सुटता कामा नयेत, असा असोसिएशनचा आग्रह आहे. अन्यथा ही बंदी पाळली जाणार नाही, असा इशारा असोसिएशनने दिला आहे. मोटर नसलेल्या पारंपरिक लहान होड्यांतून मासेमारी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव देण्यापूर्वी मच्छीमारांना विश्वासात घ्यायला हवे होते. मच्छीमारांना विश्वासात न घेता कोणत्या आधारावर मच्छीमारी काळ सरकारने ठरविला हे न समजण्यासारखे असल्याचे आफोन्सो म्हणाले.
पावसाळा सुरू होताच सागरी माशांचा प्रजनन काळही सुरू होतो. या काळात मासेमारीस बंदी लागू केली जाते; परंतु बंदीचे दिवस प्रत्येक राज्यात एकसारखे नसतात. समुद्रात एकाच वेळी मासेमारीला बंदी असावी यासाठी मासेमारीचा काळ समान ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. गोव्यासह किनारपट्टीवरील राज्यांची बैठकही होणार आहे. गोव्याने हा निर्णय मान्य असल्याचे केंद्राला कळविले आहे. बंदीचा काळ हा ७५ दिवस असावा, असेही कळविले आहे. त्यासाठी गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविण्यात येणार आहे. यापूर्वी मासेमारी बंदीचा काळ हा गोव्यात १ जून ते ३१ जुलै असा होता. (प्रतिनिधी)

Web Title: Conditional support to the organizations in the state for the same fishery ban period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.