प्लास्टिकपासून काँक्रिट!
By Admin | Updated: September 23, 2014 02:21 IST2014-09-23T02:18:44+5:302014-09-23T02:21:50+5:30
वाळूला पर्याय : मये सरकारी पॉलिटेक्निकमध्ये संशोधन प्रकल्प

प्लास्टिकपासून काँक्रिट!
पणजी : वाळूऐवजी प्लास्टिकचा वापर करून काँक्रिट तयार करण्याच्या अभिनव प्रकल्पावर मये-डिचोली येथील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये संशोधन होणार असून या कामी ब्रिटिश कौन्सिलकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. इंग्लंडमधील बाथ विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या संशोधन कार्याचा प्रारंभ मंगळवार २३ रोजी होत आहे.
पत्रकार परिषदेत या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावणारे पॉलिटेक्निकचे प्राध्यापक सुभाष बोरकर म्हणाले की, या प्रकल्पासाठी चार प्रस्ताव ब्रिटिश कौन्सिलकडे देण्यात आले होते, पैकी एक स्वीकारण्यात आला आहे. सध्या वाळूवर बंदी असल्याने काँक्रिट तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर फार लाभदायी ठरणार आहे. ६0 ते ७0 टक्के प्लास्टिक वापरून काँक्रिट तयार केले जाईल. अशा पद्धतीने तयार केलेले काँक्रिट किती टिकाव धरील, तसेच आगीपासून ते किती सुरक्षित आहे, यासंबंधी तपासणी करण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान इंग्लंडच्या बाथ विद्यापीठाकडे आहे. तेथे ती तपासणी केली जाईल.
हरित व शाश्वत काँक्रिटसाठीचा हा संशोधन प्रकल्प दोन वर्षे चालणार आहे, असे विभागप्रमुख पूर्णानंद सावईकर यांनी सांगितले. स्लॅब, कॉलम आदींसाठी हे काँक्रिट वापरता येईल, असे ते म्हणाले. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आदी टाकाऊ वस्तू वापरल्या जातील.
बाथ विद्यापीठाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. जॉन आॅर्र तसेच रिचर्ड बॉल यांचे मार्गदर्शन या प्रकल्पात लाभणार आहे. या वेळी बोलताना जॉन म्हणाले की, प्लास्टिकपासून बनविलेल्या काँक्रिटचे उच्च दर्जाच्या मायक्रोस्कोपखाली स्कॅनिंग केले जाईल. ५ सेकंदांमध्ये ३६0 छायाचित्रे टिपण्याचे तसेच काँक्रिट ब्लॉकमध्ये गॅप असेल, तर ते शोधण्याचे तंत्रज्ञानही त्यांच्याकडे आहे.
पत्रकार परिषदेस मांगिरीश रायकर तसेच एसीसी सिमेंटचे प्रतिनिधी प्रशांत पवार हेही
उपस्थित होते. (प्रतिनिधी)