सोपस्कार पूर्ण
By Admin | Updated: February 2, 2015 02:35 IST2015-02-02T02:33:48+5:302015-02-02T02:35:01+5:30
गांभीर्याचा अभाव : अभिनिवेशाने राजकीय भाषणबाजी

सोपस्कार पूर्ण
सुरेश गुदले-मोपा : मोपा विमानतळासाठी रविवारी झालेली जनसुनावणी केवळ पर्यावरणाच्या चर्चेसाठी होती. लोकशाहीत जनसुनावणी ही मत-मतांतरे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मानला जातो; परंतु या जनसुनावणीचा उपचार प्रशासन आणि लोकांनी मिळून पूर्ण केला. मोपा झाल्यात जमा आहे; ही फक्त औपचारिकता आहे, असे एका कार्यकर्त्याने ठणकावून सांगितले आणि ते खरेही वाटले.
जनसुनावणीत गांभीर्याचा अभाव तीव्रतेने जाणवला. अभिनिवेशाने केलेली राजकीय भाषणबाजी वारंवार ऐकावी लागली. काही अपवाद वगळता मोपाचे समर्थक आणि विरोधक अत्यंत उथळपणे एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच रमलेले. व्यक्तिकेंद्रित प्रतिक्रिया देणे, बोलणाऱ्याला कमी लेखणे, असे प्रकार वारंवार करण्यात अनेकांनी धन्यता मानली. घोषणाबाजी तर दणक्यात सुरू होती. भाजपने पूर्वतयारी करून कार्यकर्त्यांचे बार भरल्याचेही जाणवत राहिले. नेतेमंडळी हातवारे करून प्रोत्साहन देत होती. त्यांच्या मागेच पहिल्या
फळीतील कार्यकर्ते बसलेले.
दोन माणसं.... मातीतील आणि विमानातील
विमानतळ होणार म्हणजे दहा हजार वर्षांपूर्वीची माती नष्ट करणार. ही माती तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. या मातीचे महत्त्वच अहवालात नाही. ती नष्ट झाल्यामुळे काय परिणाम होईल त्याचा उल्लेखही अहवालात नाही, या कळकळीने मांडलेल्या प्रश्नावर समाधानकारक खुलासा मिळाला नाही. याचवेळी एक कार्यकर्ता खेळण्यातील विमान घेऊन मंडपात धावला आणि विमान उडू लागल्याचे साभिनय दाखवले.
डायलॉगबाजी...
भाषा... इत्यादी
पर्यावरणाचा अभ्यास बंद खोलीत केला की प्रत्यक्षात परिस्थिती पाहून, या प्रश्नावर खुलासा झाला नाही. अहवालात एकाच ऋतूचा विचार केला आहे, सर्व नाही, अशी माहितीही एकाने दिली. कोणत्या वर्तमानपत्रात आपण जाहिरात दिली होती, असे एका कार्यकर्त्याने विचारल्यावर मंडपातील दुसरा कार्यकर्ता म्हणाला, ‘तुमच्या घराकडे जाहिरात पाठवू का?’ दुसरा कार्यकर्ता म्हणाला, ‘आम्हाला इंग्रजी कळत नाही, कोकणीत बोला.’ तिसऱ्याने आणखी कडीच केली. ‘मैं सच कहूँगा, सच के शिवा...’ असा डायलॉग बसूनच फेकला आणि लोकांना हसवणे पसंत केले. ‘पर्यावरणाचा अभ्यास करणारे दिवसा येथे किती दिवस थांबले आणि रात्री किती थांबले,’ असा जाबही एकाने विचारला. कोंकणी उलय रें... असे एकजण अधूनमधून ओरडत होता. मायनिंग होणार नाही, विमानतळ होणार आहे रे, गप्प खाली बस, असे मंडपातून एकजण ओरडून सांगत होता. माझी जमीन देतोय, तुम्हाला काय अडचण? सरकार मूर्ख आहे काय? या एका नागरिकाच्या प्रश्नावर
गर्दीतून ‘होय, सरकार मूर्ख आहे,’ असे उत्तर आले. खाणीपेक्षा विमानतळ व्हावे, उद्योगधंदे तरी मिळतील, अशी भाबडी आशाही एकाने बोलून दाखवली.