लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन सबका साथ सबका विकास करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया. पंतप्रधानांची ही विचारधारा घेऊन गोव्यातील भाजप सरकार वाटचाल करीत आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. रोजगाराच्या संधी येतच राहणार, तसेच नोकऱ्याही येणाऱ्या कालावधीमध्ये मिळत राहतील. सतरीतील युवा वर्गाची बेरोजगारीची समस्या कायमची सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.
म्हाऊस पंचायत क्षेत्रातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये आमदार डॉ. राणे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, प्रभारी सरपंच सुलभा देसाई, इतर पंच आणि सुमारे दोन हजारांहून अधिक महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. राणे म्हणाल्या की, महिलांच्या सशक्तीकरणासाठी घरातील महिला सक्षम झाली तर ती संपूर्ण कुटुंबाचे लालनपालन योग्य प्रकारे करू शकते. घरातील महिला सशक्त झाल्या पाहिजेत. महिला म्हणजे लक्ष्मी असतात त्यामुळे त्यांची सुरक्षितता व समृद्धता ही फार महत्त्वाचे असते. सत्तरीतील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या सरकारी सोयी सुविधा दिल्या जात असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. सत्तरीतील गोरगरीब जनता ही माझ्या कुटुंबाचा विभाज्य घटक आहे, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. यावेळी पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.