कोलंबियाचा चित्रपट अव्वल
By Admin | Updated: December 1, 2015 01:55 IST2015-12-01T01:55:25+5:302015-12-01T01:55:41+5:30
पणजी : ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सोमवारी सायंकाळी शानदार समारोप झाला. ‘एब्रेस आॅफ

कोलंबियाचा चित्रपट अव्वल
पणजी : ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सोमवारी सायंकाळी शानदार समारोप झाला. ‘एब्रेस आॅफ द सर्पंट’ या कोलंबियन सिनेमाला प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला, तर रशियन सिनेनिर्माते निकिता मिखालकोव्ह यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन केले होते. दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यावेळी विख्यात संगीतकार ए. आर. रेहमान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्यपाल मृदुला सिन्हा, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी या वेळी उपस्थित होते.
उत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड झालेल्या ‘एब्रेस आॅफ द सर्पंट’ या सिनेमाचे दिग्दर्शक किंवा निर्माते या वेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे कला दिग्दर्शकांनी मुख्यमंत्री पार्सेकर व केंद्रीय राज्यमंत्री राठोड यांच्या हस्ते ‘सुवर्ण मयूर’ स्वीकारला.
युनेस्कोचे फेलिनी पदक ‘सिनेमावाला’ या बंगाली चित्रपटाला देण्यात आले. या सिनेमाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
राज्यपाल मृदुला सिन्हा व ए. आर. रेहमान यांच्या हस्ते निकिता मिखालकोव्ह यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘गेली ४० वर्षे मी या क्षेत्रात असून आपण आयुष्यात प्रथम दिल्लीतील इफ्फीमध्ये माझा पहिला चित्रपट घेऊन सहभागी झालो होतो,’ असे मिखालकोव्ह म्हणाले. राज कपूर रशियातही प्रसिद्ध होते. त्यांना वाटले असते, तर त्या वेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्षही झाले असते, असे ते म्हणाले.
ज्युरी समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ‘आईनस्टाईन इन गुवानाजुवातो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर ग्रीनअवे यांना देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार फ्रेंच अभिनेते विन्सेंट लिंडन याला ‘द मेजर आॅफ अ मॅन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तुर्कस्तानच्या ‘मुस्तांग’ चित्रपटातील पाच महिला कलाकारांना विभागून देण्यात आला. विशेष ज्युरी पुरस्कार जुलिया वार्गास यांना देण्यात आला.
सिनेमांमधून जगातील संस्कृती आपल्याला कळते. जगातील माणसांमध्ये असलेले साधर्म्य कळते. यापुढील काळातही अधिकाधिक चांगले सिनेमे देशात तयार होतील, असा विश्वास प्रमुख पाहुणे ए. आर. रेहमान यांनी व्यक्त केला.
इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील दोन वर्षांत सगळ्या साधनसुविधा उभ्या होतील, असा विश्वास मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केला.
सचिव सुनील अरोरा यांनीही विचार मांडले. राठोड, पार्सेकर, अरोरा, आर. के. श्रीवास्तव यांच्यासह राज्यपाल मृदुला सिन्हा, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक, सीईओ अमेय अभ्यंकर यांच्याही हस्ते विविध पुरस्कारांचे कलाकारांना वितरण करण्यात आले. शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीच्या सर्व सदस्यांनाही गौरविण्यात आले. २०१४ सालच्या इफ्फीचे डिझायनर गोव्याचे सुपुत्र सुशांत तारी यांनाही या वेळी गौरविण्यात आले. कबीर बेदी यांनी सूत्रनिवेदन केले. राहुल आर्या याने वाळूवर शिल्पकृती काढून भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास चितारला. (खास प्रतिनिधी)