तेरेखोलमधून बंदोबस्तात कोळसा वाहतूक
By Admin | Updated: February 9, 2015 01:12 IST2015-02-09T01:09:07+5:302015-02-09T01:12:01+5:30
महाराष्ट्र सागरी संरक्षण पोलिसांची दमदाटी

तेरेखोलमधून बंदोबस्तात कोळसा वाहतूक
मांद्रे : तेरेखोल नदीमधून बेकायदा बार्जवाल्यांनी माशांची जाळी उद््ध्वस्त करून महाराष्ट्र कोस्टल दलाच्या पोलिसांच्या मदतीने मच्छीमारांना दमदाटी करून रविवारी कोळशाची बेकायदा वाहतूक केली.
दुपारी १२.३० वा. केरी तेरेखोलचे पंच सदस्य डायगो फ्रान्सिस रॉड्रिगीस, पंच सदस्य यशवंत नार्वेकर, पंच सदस्य रत्नाकर हर्जी, तसेच समाजसेवक जनार्दन कासकर व इतर बेकायदा बार्ज वाहतुकीबद्दल जाब विचारण्यासाठी बार्जजवळ गेले असता बार्जच्या कॅप्टनने महाराष्ट्र सागरी पोलिसांना बोलावून घेतले. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी पंच मंडळींना सहकार्य न करता उलट हुसकावण्याचा प्रयत्न केला.
पंचायत मंडळाने ग्रामसभेमध्ये तेरेखोल नदीतून कुठल्याही प्रकारच्या खनिज वाहतुकीसाठी निर्बंध घालण्याचा ठराव संमत केला असल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्र सागरी पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका पंचाने ‘तुम्ही गोव्याच्या हद्दीत येऊन दादागिरी करता’, असे सांगताच वातावरण
तंग बनले होते.
किरणपाणी जेटीवर संपूर्ण कोळसा खाली केल्यानंतर पुन्हा कोळसा आणण्यासाठी समुद्रामध्ये बार्ज निघाली. तेरेखोल किल्ल्याच्या जवळ समुद्रातील दगडावर बार्ज आपटून अडकून पडली. समुद्राच्या लाटांमुळे बार्ज खडकांवर आपटून खडक फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बुरुंजालाही धोका पोहचू शकतो, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
गोव्यातील नदीशी निगडित असलेली सगळी खाती निस्तेज किंवा बरबटलेली आहेत, असा आरोप पंच रॉड्रिगीस यांनी केला. गोवा सरकारच्या सगळ््या खात्यांना बेकायदा बार्ज (खनिज) मधून कोळसा वाहतुकीसंदर्भात दूरध्वनी करूनही काहीच उपयोग झाला नाही, असे ते म्हणाले. या कोळसा वाहतुकीकडे संबंधित खाती जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, रिकामी बार्ज लाटांमुळे खडकांवर आपटून धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, या बेकायदा कोळसा वाहतुकीवर
निर्बंध घालण्याची मागणी मच्छीमारांनी केली. (प्रतिनिधी)